डोंबिवली : डोंबिवली पूर्व आयरे गावातील राघो हाईट्स ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाने सुरूवात केली आहे. सात माळ्याच्या या बेकायदा इमारतीत ३७ सदनिका आणि व्यापारी गाळे आहेत. ही इमारत जमीनदोस्त करायची असल्याने ग प्रभागाने या इमारतीमधील विकासक, रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच रामनगर पोलिसांना पत्र देऊन ही इमारत रहिवासमुक्त करण्यासाठी आणि कारवाईसाठी पोलीस बळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या बेकायदा इमारत प्रकरणी या भागातील रहिवासी उज्जवला पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. राघो हाईट्स या बेकायदा इमारतीचे मूळ भूक्षेत्र २१० चौरस मीटर असताना बांधकामधारकांनी ते बनावट सात बारा उताऱ्याच्या आधारे ४०० चौरस मीटर दाखवले. या इमारतीच्या उभारणीसाठी विकासकांंनी पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या, महसूल विभागाचे बनावट बिनशेती आदेश वापरले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचा नोंदणी प्रमाणपत्रे बांधकामधारकांनी मिळवला, अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
या बनावट दस्तऐवज प्रकरणी रामनगर पोलिसांनी राघो हाईट्सचे विकासक मे. मोरया इन्फ्राचे नितीन बाळानंद नाईक (रा. मुंब्रा रेतीबंदर), भीम राघो पाटील, सुरेखा नाना पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल आहे. ग प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे (निलंबित) यांनी चार वर्षापूर्वी राघो हाईट्स इमारत अनधिकृत घोषित केली होती. या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अवधूत तावडे यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांना दिले आहेत.
विकासकाला नोटीस
आपल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. आपण येत्या दहा दिवसात राघो हाईट्स इमारत रहिवास मुक्त करून स्वताहून जमीनदोस्त करून घ्यावी. तसे केले नाहीतर पोलीस बळाचा वापर करून राघो हाईट्स बेकायदा इमारत जमीनदोस्त केली जाईल, असे साहाय्यक कुमावत यांनी विकासक नितीन नाईक आणि रहिवाशांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. ३७ सदनिकांमधील १५ सदनिका, गाळे बंद आहेत. या इमारतीच्या नऊ सदनिकांमध्ये जितू पाटील हे मालक असल्याचे पालिका पथकाला आढळले आहे.
राघो हाईट्सवर कारवाईच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. ही इमारत रहिवासमुक्त करण्यासाठी रामनगर पोलिसांना पत्र दिले आहे. ही इमारत रहिवास मुक्त झाल्यानंतर जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.
संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.
६५ बेकायदा इमारतींवर पालिकेकडून अद्याप कारवाई सुरू झालेली नाही. पालिकेने राघो हाईट्स इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई करावी. लवकरात लवकर ही इमारत तोडण्यात यावी अन्यथा न्यायालयात दाद मागण्याची तयारी ठेवली आहे.
उज्जवला पाटील, तक्रारदार