डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील नियंत्रक फ प्रभागातील साहाय्यक आयुक्ताची गेल्या आठवड्यात बदली झाली. नव्याने आलेल्या साहाय्यक आयुक्ताला फेरीवाले जुमानत नसल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सकाळ ते रात्री उशिरापर्यंत ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. दर दोन महिन्यांनी आयुक्तांकडून फेरीवाल्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याने प्रभाग कार्यालयातील कर्मचारी नाराज आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणेकरांपुढील पाणी टंचाईचे संकट टळले; स्टेम प्राधिकरणामार्फत होणारे दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम रद्द

फ प्रभागात यापूर्वी दिनेश वाघचौरे हे साहाय्यक आयुक्त होते. त्यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पादचाऱ्यांना त्रास होईल अशा पध्दतीने एकही फेरीवाला बसणार नाही असे नियोजन केले होते. सकाळ नऊ ते रात्री उशिरापर्यंत फ आणि ग प्रभागाची पथके तैनात होती. त्यामुळे एकही फेरीवाला रेल्वे स्थानक परिसरात बसत नव्हता. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांची बदली होऊन आता भरत पाटील हे साहाय्यक आयुक्त म्हणून फ प्रभागात आले आहेत. काही महिन्यापूर्वी पाटील फ प्रभागात साहाय्यक म्हणून कार्यरत होते. बेकायदा बांधकाम, फेरीवाल्यांवर दिखाव्याच्या कारवाई करण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. फ प्रभागाचा पदभार पाटील यांनी स्वीकारताच आपला साहेब आला म्हणून फेरीवाल्यांनी पुन्हा रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, चौकांमध्ये ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>>कल्याण: देसई खाडी पुलावर तुळई ठेवण्याच्या कामासाठी शिळफाटा रस्ता रात्रीच्या वेळेत आठ दिवस बंद

डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली परिसरातील फेरीवाले यापूर्वी हटविण्यात येत होते. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे रस्ते उपलब्ध होते. साहाय्यक आयुक्त म्हणून पाटील यांनी पदभार स्वीकारताच फेरीवाले पुन्हा रस्त्यांवर येऊन बसण्यास सुरुवात झाली आहे. पाटील हे लेखा परिक्षण विभागातील तांत्रिक अधिकारी आहेत. त्यांना साहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती देता येत नाही, तरीही त्यांना साहाय्यक आयुक्त करण्यात आल्याने अनेक समपदस्थ पात्र कर्मचारी नाराज आहेत. आपल्यावर अन्याय करुन या नियमबाह्य नियुक्त्या प्रशासन कशासाठी करते, असे प्रश्न पात्र कर्मचारी करत आहेत.

हेही वाचा >>>केडीएमटी बसला बेलापूर इथे लागली आग

पालिका विभागीय कार्यालयाच्या बाजुलाच फेरीवाले ठाण मांडून बसत आहेत. तरीही पालिका कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने प्रशासनाचा साहाय्यक आयुक्तांवर वचक आहे की नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. डोंबिवलीत साहाय्यक आयुक्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ उपायुक्त आहेत. फेरीवाले रस्त्यावर बसू लागल्याने सकाळ, संध्याकाळच्या वेळेत फेरीवाल्यांमुळे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा कोंडी होत आहे. रेल्वे स्थानकात जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करत रिक्षा वाहनतळ, बाजीप्रभू चौकातील बस थांब्यापर्यंत यावे लागते.
फ प्रभागात सक्षम साहाय्यक आयुक्त देण्यात यावा, अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे करण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात संदीप रोकडे यांनी निष्क्रियपणे काम सुरू ठेवले होते. त्यांच्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेत आयुक्तांकडे आल्या होत्या. अखेर आयुक्तांनी रोकडे यांची साहाय्यक आयुक्त पदावरुन उचलबांगडी करुन अडगळीच्या आपत्कालीन विभागात पदस्थापना त्यांना दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli east railway station area is again a hawker haunt amy