डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजीप्रभू चौक, स्कायवाॅक खालील रिकाम्या गाळ्यांमध्ये, फडके रस्त्यावरील इमारती, रस्ते, चौकांच्या मोकळ्या जागांमध्ये काही राजकीय मंडळी टपऱ्या टाकून वाहतूक, पादचाऱ्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गात अडथळे उभे करत आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी या टपऱ्या उचलल्या तर त्यांना अर्वाच्च भाषेत बोलून त्यांना बदली करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राने दिली.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात आले की जागोजागी दिसणाऱ्या टपऱ्यांमुळे अडथळे आणि विद्रुपीकरण दिसत आहे. एकीकडे पालिकेने शहर सौंदर्यीकरणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अशावेळी एका राजकीय पक्षातील काही कार्यकर्ते ‘आमची राज्यात सत्ता आहे. आमच्या टपऱ्यांना कोणी हात लावयाचा नाही. आमच्या टपऱ्यांना हात लावला तर सरसकट सर्व टपऱ्यांवर कारवाई करा,’ असे अर्वाच्च भाषेत पालिकेच्या फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार, अधिकाऱ्यांना बोलून टपऱ्यांवर कारवाई न करण्याची धमकी देत आहेत. टपऱ्यांवर कारवाई केली तर अधिकाऱ्याला बदली करण्याची धमकी दिली जाते, असे सुत्राने सांगितले.
हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकल वेळ दर्शक सव्वा तास बंद
डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकात महावितरणचे वीज देयक भरणा केंद्र आहे. याच भागात केडीएमटीची बस थांबा आहे. दोन ते तीन रिक्षा वाहनतळ या भागात आहेत. अशी कोंडीची परिस्थिती फडके रस्त्यावरील बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, पाटकर रस्ता, नेहरु रस्ता भागात आहे. अशा कोंडीच्या वातावरणात काही राजकीय कार्यकर्ते दहशतीचा अवलंब करुन आपल्या टपऱ्या डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील स्कायवाॅक खाली, केडीएमटी बस थांबा, स्वच्छतागृह, नाटक तिकीट खिडकी विक्रीच्या बाजुला अशा मोक्याच्या ठिकाणी तेथे वडापाव, पाणी पुरी इतर व्यवसाय करत आहेत. या टपऱ्यांच्या भागात ग्राहक, त्यांच्या दुचाकी वाहनांची गर्दी होते. याठिकाणी रिक्षा वाहतुकीला अडथळा होतो. हे माहिती असुनही राजकीय कार्यकर्ते फ प्रभागातील अधिकारी, फेरीवाला हटाव पथकाला न जुमानता रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानक भागातील मोक्याच्या ठिकाणी टपऱ्या आणून ठेवतात. कारवाई टाळण्यासाठी सकाळीच त्या बेकायदा टपरीत वडापाव, चहा विक्रीचा व्यवसाय सुरू करतात, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> दिवा कचराभुमी अखेर बंद
बाजीप्रभू चौकात केडीएमटी बस थांब्याजवळ राजकीय कार्यकर्त्यांच्या टपऱ्यांनी गर्दी केली आहे. महावितरण कार्यालयाच्या बाहेर बेकायदा टपऱ्या लावून ठेवण्यात आल्या आहेत. स्कायवाॅकखाली टपऱ्यांमध्ये वडापाव विक्रीचा व्यवसाय जोमाने केला जात आहे. फ प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. अधिकारी, फेरीवाला हटाव पथकाने कारवाई केली की टपरी चालक आपल्या राजकीय पदाधिकाऱ्याला संपर्क करुन अधिकाऱ्याला समज देण्याची मागणी करतात. राजकीय पदाधिकारी दमदाटीच्या भाषेत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देतो. फेरीवाला हटाव पथकातील कामगार दमदाटीच्या वातावरणामुळे कारवाई करायला घाबरत आहेत.
कारवाईनंतर टपऱ्या जागीच
मंगळवारी दुपारी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, फेरीवाला हटाव पथक प्रमुख आणि त्यांचे १६ कामगार यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बहुतांशी बेकायदाशीर टपऱ्या उचलून जप्त केल्या. पथक प्रमुख मुरारी जोशी यांनी आक्रमकपणे ही कारवाई केली. या बेकायदा टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली जोशी यांनी सुरू केल्या होत्या. टपऱ्या जप्तीची कारवाई सुरू असताना टपरी चालकांनी आम्ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या टपऱ्यांवर कारवाई करू नका. असे बोलून कारवाईची माहिती आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला दिली. पदाधिकाऱ्याने तात्काळ फ प्रभागातील एका अधिकाऱ्याला संपर्क करुन सरसकट सर्वच टपऱ्यांवर कारवाई करा. विशिष्ट टपऱ्यांना अभय देऊ नका, असे सांगून ठराविक टपऱ्या उचलून भेदभाव केला तर तुमची बदली करू, अशी धमकी एका अधिकाऱ्याला दिली.
त्यानंतर जबरदस्तीने पालिका अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या टपऱ्या रात्रीच सोडवून घेतल्या. पहाटे पुन्हा पालिका अधिकाऱ्यांना आव्हान देत त्या टपऱ्या रेल्वे स्थानक भागातील स्कायवाॅक, बाजीप्रभू चौकात आणून ठेवल्या आहेत.
“रेल्वे स्थानक भागातील बेकायदा टपऱ्या हटविण्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे. एकही टपरी स्थानक भागात राहणार नाही. राजकीय दबावाला न जुमानता आम्ही कारवाई करत आहोत.”