डोंबिवली: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात कल्याण डोंबिवली पालिकेने स्वच्छतेसाठी स्वच्छता दूत नेमले होते. हे दूत स्वच्छतेसंंदर्भात काम करण्याऐवजी कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना, पादचाऱ्यांना पकडून त्यांना अरेरावी करून लुटमार करत असल्याच्या वाढत्या तक्रारी पालिका आयुक्तांपर्यंत पोहचल्या होत्या. असाच प्रकार गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात वाढत चालल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी नागरिक, पादचारी यांना होणारा त्रास विचारात घेऊन या स्वच्छता दुतांंवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील स्वच्छता दुतांच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी घेतली. वरिष्ठांच्या आदेशावरून मुख्य स्वच्छता निरीक्षक वसंत देगलुरकर यांनी स्वच्छता दुतांना नागरिकांना त्रास देत असताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत प्रवाशांना हा त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रवासी, पादचाऱ्यांकडून करण्यात येत होत्या. उपायुक्त पाटील यांनी कल्याणमधील या स्वच्छता दूत नियंत्रकांचा करारनामाही रद्द केला.
डोंबिवलीत उपद्रव
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सकाळी आठ ते दहा या वेळेत पालिकेने नेमलेले निळ्या गणवेशातील तीन स्वच्छता दूत डाॅ. राॅथ रस्ता, पाटकर रस्ता भागात गस्त घालतात. हे स्वच्छता दूत नागरिक, रेल्वे स्थानकातून बाहेर येणारा प्रवासी याचा अंदाज घेऊन त्याला अडवतात. तुमच्याजवळ गुटख्याची पिशवी आहे. तुम्ही याठिकाणी थुंकलात, तुम्ही प्रतिबंधित वस्तू जवळ बाळगली, असा आरोप दटावणीच्या स्वरुपात नागरिकांवर करतात. प्रवासी घाबरला की मग त्याला फैलावर घेतात. तडजोडीने हा विषय मिटवतात, असे डाॅ. राॅथ रस्त्यावरील काही व्यापाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हा तडजोडीचा प्रकार सीसीटीव्हीच्या चित्रणात येऊ नये रामनगर तिकीट खिडकी समोरील सीसीटीव्हीचा झोत नसलेल्या एका ड्राय फ्रुटच्या दुकानाजवळ चालतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
स्वच्छता दूत कामे
कोठे कचरा पडला असेल तर त्याची माहिती नियंत्रकांना देणे, पादचारी रस्त्यावर थुंकला, त्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे अधिकार स्वच्छता दुतांना आहेत.
डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात स्वच्छता दुतांचा नागरिकांना उपद्रव वाढल्याच्या खूप तक्रारी वाढत आहेत. नेमलेली कामे सोडून स्वच्छता दूत वेगळीच कामे करत आहेत. त्यांचे कंत्राट रद्द करून ते काम महिला बचत गटांना देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. – अतुल पाटील (उपायुक्त, घनकचरा विभाग)