लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली- डोंबिवली शहराच्या विविध भागातील सुमारे ३०० हून अधिक स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांनी शुक्रवारी मासळी बाजार बंद ठेवला आहे. वसई, भाईंदर, नायगाव, अर्नाळा, विरार भागातून येणाऱ्या मासळी विक्रेत्यांमुळे व्यवसायावर परिणाम होऊन उपासमारीची वेळ आल्याचा दावा करत या विक्रेत्यांविरोधात स्थानिक विक्रेत्यांनी दंड थोपटले आहेत.
काही वर्षांपासून डोंंबिवलीतील चोळे, ठाकुर्ली, कोपर, आयरे, काटई, मानपाडा, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण परिसरात दररोज पहाटे मासळी विक्रीसाठी भाईंदर, अर्नाळा, वसई, विरार, नायगाव भागातून सुमारे २०० हून अधिक मासळी विक्रेत्या महिला येतात. वसई परिसरातून येणाऱ्या मासळी विक्रेत्या स्वस्तात मासळी आणून डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, अंबरनाथ, २७ गाव भागात घाऊक, स्वस्त दरात मासळीची विक्री करतात. डोंबिवली परिसरातील मासळी विक्रेते पहाटे मुंबईत भाऊचा धक्का आणि परिसरात जाऊन मासळी घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात, असे मासळी विक्रेत्या सुवर्णा माळी यांनी सांगितले.
आणखी वाचा-कल्याण: अंगावर कचरा पडल्याचे सांगून लाख रुपये केले लंपास
वसई परिसरातून २०० हून अधिक मासळी विक्रेत्या महिला दररोज डोंबिवली परिसरात मासळी विक्रीसाठी येतात. त्या स्वस्तात मासळी विक्री करतात. त्यामुळे सर्व ग्राहक या मासळी विक्रेत्यांच्याकडे खरेदी करतात. स्थानिक मासळी विक्रेत्या दिवसभर दुकान मांडून बसल्या तरी त्यांच्या मासळीची विक्री होत नाही. या प्रकाराने स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. मासळी खरेदीचा खर्चही मासळी विक्रीतून निघत नाही. अनेकांची कुटुंबे या मासळी विक्री व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती मासळी विक्रेती आलिशा म्हात्रे यांनी दिली. गेल्या महिन्यांपासून डोंबिवलीतील ३०० हून अधिक मासळी विक्रेत्या महिलांंनी वसई भागातून येणाऱ्या मासळी विक्रेत्यांना विरोध करण्यास सुरूवात केली आहे. आमदार प्रमोद पाटील, माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
शांततेत आंदोलन
वसई भागातून येणाऱ्या मासळी विक्रेत्यांना रोखण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा पुढे येत नाही. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकाळपासून डोंबिवली परिसरातील मासळी विक्रेत्या महिलांनी शहरातील विविध चौकातील मासळी बाजार बंद ठेवले. उमेशनगर भागात आंदोलन केले.
आणखी वाचा-अंबरनाथ: वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेला शेतकी सोसायटीचा विरोध
मासळीचा ठणठणाट
डोंबिवलीत उमेशनगर, कोपर, आयरे, चोळे, काटई, लोढा पलावा भागात स्थानिक मासळी विक्रेत्यांचे व्यवसाय आहेत. हे व्यवसाय शुक्रवारी बंद असल्याने रहिवाशांना मासळीसाठी वणवण करावी लागली. रहिवाशांना रेल्वे स्थानक भागातील मासळी बाजारात जाऊन मासळी खरेदी करावी लागली.
“ स्थानिक, बाहेरचे मासळी विक्रेते असा अनेक वर्षापासुनचा डोंबिवलीत वाद आहे. याविषयी दोन्ही बाजुच्या संघटना पदाधिकाऱ्यांना एकत्र बसून सामोपचाराने मा्र्ग काढला जाईल. -राहुल खंदारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर.
“ बाहेरून येणाऱ्या मासळी विक्रेत्यांमुळे स्थानिक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जोपर्यंत बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना थांबविले जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. -सुवर्णा माळी, मासळी विक्रेती.