डोंबिवली – २७ वर्षाच्या परंपरा असलेल्या डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत यावेळी स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंब या समृध्द व संस्कृती जीवनाच्या पंचसुत्रीवरील चित्ररथ असणार आहेत. याशिवाय आठवडाभर धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. वृंदावनचे प्रभूदेशदास धर्मप्रसारक महंद आचार्य प्रणय महाराज यावेळच्या नववर्ष स्वागत यात्रेचे विशेष अतिथी असणार आहेत.
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे ही नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते. स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गणेश मंदिराच्या अध्यक्षा, प्रवचनकार अलका मुतालिक, विश्वस्त प्रवीण दुधे, गौरी खुंटे, श्रीपाद कुळकर्णी, प्रमुख संयोजक अमेय काटदरे, मंदार हळबे, जयकृष्ण सप्तर्षी, आनंद धोत्रे, राजय कानिटकर, दीपक काळे, आकाश गायकवाड उपस्थित होते.
देशातील सध्याचे वास्तवदर्शी चित्रण स्वगात यात्रेच्या माध्यमातून प्रकट करावे म्हणून यावेळी समृध्द व संस्कृती जीवन पध्दतीवर चित्ररथांची आखणी करण्यात आली आहे. विविध प्रकारचे ४० हून अधिक चित्ररथ स्वागत यात्रेत सहभागी असतील. ८० विविध प्रकारच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रातील संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. स्वागत यात्रेच्या सलगतेमध्ये कोठेही खंंड पडू नये म्हणून चौदा ढोल पथकांना चौकांमध्ये ढोल वादनास परवानगी देण्यात आली आहे. संस्कार भारतीतर्फे गणेश मंदिरासमोर महारांगोळी काढण्यात येणार आहे. सोमवारी दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला राष्ट्रभक्तीपर गीतांचा देवदेशोपसनेचा कार्यक्रम मंदिरात पार पडला.
स्वागत यात्रेचे औचित्य साधून जून महिन्यापासून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मंदिरात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळच्या वेळेत सामुदायिक वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. डोंबिवलीतील १६ शाळांमधील आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना गणेश मंदिर संस्थानतर्फे २५ ते २७ मार्च या कालावधीत डोंबिवलीतील पूजा सिनेमागृहात संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट मोफत दाखविला जाणार आहे.
२८ मार्च रोजी गणेश मंदिर येथे संध्याकाळी सात वाजता भक्तिगीत व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. २९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता महिला, पुरूष, तरूणांसाठी खुली असलेली स्कुटर फेरी शहरातील १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर काढण्यात येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भागशाळा मैदान येथे साहसी खेळ, मानवी मनोरे, ढोल, लेझीम पथकांची प्रात्यक्षिके संध्याकाळी साडे पाच वाजता होणार आहेत.
रविवारी सकाळी पाच वाजता आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गणेश मंदिरात महापूजा होईल. सात वाजता भागशाळा मैदान येथून प्रचलित मार्गावरून स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे. ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान राम नाम जपयज्ञ होणार आहे.
फोटो ओळ