डोंबिवली : नांदिवली पंचानंद येथे भूमाफियांनी उभारलेली बेकायदा राधाई इमारत तोडण्याचे आदेश जमीन मालकाने उच्च न्यायालयातून आणले आहेत. ही इमारत तोडण्यास भाजप कार्यकर्त्यांसह भूमाफियांनी जोरदार विरोध केला. न्यायालयाच्या आदेशाने ही बेकायदा इमारत तुटणार असल्याने विरोध करणाऱ्यांमधील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे. यासाठी आपण आम्हाला संरक्षणाच्या दृष्टीन कार्यवाही करावी, अशी मागणी राधाई इमारतीच्या जमिनीचे मालक जयेश हिरामण म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपायुक्त सचीन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना देण्यात आल्या. आपल्या मालकीच्या हक्काच्या नांदिवली पंचानंद येथील जमिनीचा भूमाफियांनी बेकायदा ताबा घेतला. त्यावर बेकायदा राधाई इमारत आम्हाला धाकदपटश्या दाखवून उभारण्यात आली. त्यावेळीही आम्हाला विविध माध्यमातून धमक्या, दटावण्यात केल्या जात होत्या, असे तक्रारदार जयेश म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…‘माधव’ इमारत तोडल्याने कल्याण मलंगरोड, उल्हासनगर रस्त्यामधील अडथळा दूर
राधाई इमारतही जमीनदोस्त होणार असल्याने या इमारतीवरील आपला हक्का कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेले, तसेच या इमारतीच्या तोडकामाला विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांसह इतर गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही या विरोध आंदोलनात सहभागी झाले होते. अशा मंडळींपासून आपल्यासह आपल्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असे जयेश यांनी तक्रारीत म्हटले आहे.
राधाई इमारत तोडू नये म्हणून विरोधासाठी जमललेल्यांमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीचे, काही तुरूंगात जाऊन आलेले लोक होते. राधाई इमारत तोडण्यासाठी आलेल्या पालिका आणि पोलिसांसमोर या मंडळींनी जो धिंगाणा घातला. त्यावरून ते आपली पातळी सोडून इमारत वाचविण्यासाठी काहीही करू शकतात, असे तक्रारीत म्हटले आहे.
गेल्या चार वर्षापूर्वी जयेश म्हात्रे यांच्या नांदिवली पंचानंंद येथील वडिलोपार्जित जमिनीचा दहशतीच्या जोरावर ताबा घेऊन मे. स्वस्तिक होम्सचे मयूर रवींद्र भगत यांच्यासह सचीन विष्णू पाटील, संजय विष्णू पाटील, राधाबाई विष्णू पाटील, सुरेश मारूती पाटील यांनी संगनमत राधाई बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे, असे जयेश यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…डोंबिवलीत नवापाडा येथे बेकायदा इमारतीत भूमाफियाकडून सव्वा दोन लाखाची पाणी चोरी
राधाई तोडण्यास विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे, दृश्यध्वनी चित्रफित, समाज माध्यमांवर भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केलेले इमारत तोडण्या विरोधातील छायाचित्रे जयेश यांनी जमा करून उच्च न्यायालयात दाखल करण्याची तयारी केली आहे.
हेही वाचा…ठाणेकर कोंडीच्या विळख्यात; घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोंडी
गुन्हे दाखल करा
राधाई इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांन चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी पोलिसांकडे केली आहे. डोंबिवलीतील ब्राह्मण सभेसमोरील आपल्या मालकी हक्काच्या जमिनीवरील भावना बेकायदा इमारत तोडण्यास १५ वर्षापूर्वी पालिकेचे पथक आले होते. त्यावेळीही भाजपचे पदाधिकारी ही कारवाई रोखण्यासाठी पुढे आले होते, अशी पुष्टी गोखले यांनी जोडली, बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असे गोखले यांनी तक्रारीत म्हटले आहे.