डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागे अधिकृत कृष्णा टाॅवरच्या बाजुला बांधकामधारकांनी गेल्या महिन्यापासून रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली आहे. या बेकायदा बांधकामाविषयी शासन, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांकडे तक्रारदाराने तक्रार केल्यावर पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी तातडीने हे बांधकाम थांबविण्याचे आदेश संबंधित बांधकामधारकांना दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांधकामे उभे राहत असलेल्या जमिनीची मालकी हक्काची कागदपत्रे, पालिकेच्या बांधकाम परवानग्या इतर आवश्यक कागदपत्रे पालिकेच्या ह प्रभागात दाखल करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बांधकामधारकांना दिले आहेत.

हेही वाचा : ठाण्यात दिवाळी काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ, चार दिवसांत ३३ ठिकाणी लागली आग

गेल्या सहा महिन्यापासून बांधकामधारक चरू बामा म्हात्रे शाळेमागील कॅप्टन तुकाराम हश्या म्हात्रे मार्गावरील वर्दळीचा रस्ता बंद करून कृष्णा टाॅवरच्या बाजुला एका बेकायदा इमारतीची उभारणी करत आहेत. या बेकायदा इमारतीच्या चारही बाजुने तीन ते सहा मीटर मोकळी जागा नाही. सामासिक अंंतर न ठेवता या बेकायदा इमारतीची उभारणी केली जात असल्याने या इमारतीच्या लगतच्या इमारतींमधील रहिवासी त्रस्त आहेत.

या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून गेल्या दीड महिन्यापासून जागरूक नागरिक विनोद जोशी मुंंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. नगरविकास विभागाने या उपोषणाची दखल घेतली. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना संबंधित बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे सूचित केले. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी कोपर येथे जाऊन म्हात्रे शाळेमागील बेकायदा बांधकामांचा पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला. हे बांधकाम राजकीय आशीर्वादने सुरू असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
बांधकामाच्या ठिकाणी नोटीस चिकटवून साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बांधकामाला तातडीने स्थगिती दिली. पालिकेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता बांधकाम सुरू ठेवल्यास ते भुईसपाट करण्याची तंबी नोटिसीत दिली आहे.

विधानसभा निवडणूक कामात ह प्रभाग कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचा गैरफायदा घेत बांधकामधारकांंनी बेकायदा बांधकाम सुरूच ठेवले आहे. बांधकामाचे सर्व नियम दुर्लक्षित करून घाईघाईने हे बेकायदा बांधकाम पूर्ण केले जात आहे. निकृष्ट पध्दतीने सुरू असलेले हे बांधकाम पालिकेने तातडीने थांबवावे, अशी मागणी तक्रारदार विनोद जोशी यांनी केली आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी

या बेकायदा बांधकामांच्या लगतच्या इमारतींमधील रहिवासी या बेकायदा बांधकामामुळे त्रस्त आहेत. या बेकायदा इमारतीमधील सदनिका खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विकून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता तक्रारदाराने व्यक्त केली. तक्रारदाराकडे या बेकायदा बांधकामाची इत्यंबूत माहिती आहे.

कोपर येथील चरू बामा म्हात्रे शाळेमागील बांधकामाला स्थगिती दिली आहे. बांधकामाची सर्व कागदपत्रे पालिकेत दाखल करण्याची नोटीस बांधकामधारकाला दिली आहे. निवडणूक कामात आपणासह कर्मचारी व्यस्त आहेत. तरीही कोपरचे बांधकाम सुरू असेल तरी ते निवडणूक कामातून मुक्त झाल्यावर भुईसपाट केले जाईल.

राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli illegal building construction even after stay from municipal corporation css