डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी नष्ट करून उभारलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी गुरुवारपासून महापुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत. कमी किमतीत मिळालेले घर दरवर्षी पुराच्या पाण्यात जात असल्याने या भागातील फसवणूक झालेले घर खरेदीदार आता त्रस्त आहेत.
डोंबिवली शहरातील सर्वात मोठा हरितपट्टा म्हणून पश्चिमेतील देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, मोठागाव, सातपूल, कोपर भाग म्हणून ओळखला जात होता. खारफुटीची घनदाट जंगले या भागात होती. विविध प्रकारची जैवविविधता येथे होती. विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी या भागात पाहण्यास मिळत होते. पर्यावरण अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार यांचा या भागात सतत राबता असायचा.
हेही वाचा…कल्याणमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
पालिका अधिकरी, पोलीस यांच्या संगनमताने भूमाफियांनी देवीचापाडा परिसरातील खारफुटीचे घनदाट जंगल नष्ट केले. खाडी किनारा भागात मातीचे २० फूट उंचीचे भराव करून या भागात बेकायदा चाळींची उभारणी केली. या चाळींमधील घरे तीन ते पाच लाखाला सामान्यांना विकली. या भागात मोठा नवमतदार निर्माण झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागात पाणी, रस्ते, पथदिवे यांची उभारणी करून दिली आहे.
या भागातील भूखंडावर एक धार्मिक स्थळ राजकीय आशीर्वादाने काही मंडळींनी उभारले आहे. पालिकेचा टिटवाळा ते डोंबिवली देवीचापाडा, मोठागाव ते कोपर, आयरे, काटई-हेदुटणे बाह्य वळण रस्ता या बेकायदा चाळींच्या भागातून जात आहे.
महापालिकेची उद्यान, बगिचे अशा अशा अनेक सुविधांची येथे आरक्षणे आहेत. सुमारे ४० एकरहून अधिक भौगोलिक क्षेत्र असलेला हा पट्टा आहे. कुंभारखाणपाडा भागात खाडी किनारी पोहच रस्ते नसताना, पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता शिवसावली नावाने दहा बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प कुंभारखाणपाडा भागात खाडी किनारी सुरू आहे. गणेशनगर, खंडोबा मंदिर परिसरात पालिकेच्या परवानग्या न घेता बेकायदा इमारती खाडी परिसरात उभारल्या जात आहेत. या टोलेजंंग इमारती उभ्या राहत असताना पालिका अधिकारी फक्त दिखाव्या पुरती कारवाई करून या बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत, असे या बेकायदा बांधकामांच्या विरुध्द लढा देणारे निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर यांनी सांगितले. अशाच पाच हजाराहून अधिक चाळी आयरे, कोपर पूर्व भागात आहेत. पालिकेने या बेकायदा बांधकामांवर ऑक्टोबरनंतर कारवाई करून या भागातील पालिकेचे भूखंंड, सरकारी जमिनी ताब्यात घेण्याची मागणी जागरूक नागरिकांंकडून केली जात आहे.
हेही वाचा…कल्याणमध्ये केस सजावटकार महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी
पालिका अधिकाऱ्यांनी मात्र आम्ही नेहमीच या भागातील बेकायदा चाळींवर कारवाई केली. ही कारवाई करताना राजकीय मंडळी दबाव आणतात. वेळोवेळी कारवाईत अडथळा आला, असे स्पष्ट केले.
हेही वाचा…ठाणे : खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू, मागून येणाऱ्या भरधाव मोटारीची धडक; शिळफाटा भागातील घटना
देवीचापाडा, कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्टा बेकायदा चाळी, इमारतींसाठी भूमाफियांनी नष्ट केला आहे. या भागात दरवर्षी महापुराचे पाणी घुसते. सामान्यांचे संसार रस्त्यावर येतात. अधिकाऱ्यांचे हे पाप आहे. – महेश निंबाळकर, संस्थापक, निर्भय बनो संस्था.