Dombivli : डोंबिवलीतील देवीचा पाडा या भागात दैव बलवत्तर कसं असतं या म्हणीचा अनुभव येणारी एक घटना घडली आहे. १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली पडला. मात्र इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाचे अचानक लक्ष गेलं आणि भावेश यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली. हा चिमुरडा त्यांच्या हातावर आला आणि नंतर पायावर पडला. यात चिमुकला किरकोळ जखमी झालाय. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.
नेमकं काय घडलं?
एखाद्या चित्रपटातला प्रसंग वाटावा अगदी तशीच घटना २५ जानेवारीला घडली आहे. डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात या भागात एक इमारत आहे, या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षांचा मुलगा अचानक तोल गेल्याने खाली पडला. तो खाली पडताना त्याला त्याच भागात राहणाऱ्या भावेश म्हात्रेने पाहिलं. भावेश यांनी लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली. आधी हा मुलगा त्यांच्या हातांवर आणि मग पायांवर पडला. या घटनेत दोन वर्षांच्या मुलाला दुखापत झाली आहे पण त्याचा जीव वाचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडल्याची चर्चा आता लोक करत आहेत. सीसीटव्ही फुटेजमध्ये ही दृश्यं कैद झाली आहेत. इमारतीच्या बाहेर तीन ते चार माणसं बाहेर पडताना दिसतात. तेवढ्यात भावेश म्हात्रे धावत जातात आणि दोन वर्षांच्या या मुलाचा जीव वाचवतात ही दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
भावेश म्हात्रे यांचं होतं आहे कौतुक
डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. एका १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडणाऱ्या या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव भावेश म्हात्रे या तरुणाच्या धाडसामुळे वाचला. चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता भावेशने केलेल्या प्रयत्नाची घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
थोडक्यात बचावला दोन वर्षांचा मुलगा
भावेश म्हात्रे यांनी जे प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे दोन वर्षांचा मुलगा जमिनीवर थेट न पडता त्यांच्या हाता-पायांवर पडला. त्यामुळे त्याला थोडं लागलं पण त्याचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भावेश म्हात्रे यांच्या प्रसंगावधानाने एका लहान बाळाचा जीव वाचला. भावेश म्हात्रे यांच्या कृतीमुळे “देव तारी त्याला कोण मारी” असाच अनुभव लोकांना आला आहे.