डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावर रस्तारुंदीकरण आणि भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी जेसीबीच्या साहाय्यााने खोदकाम सुरू असताना सुभाष रस्त्यावरील एका जुनाट वर्दळीच्या रस्त्यावरील जांभळाचे झाड रविवारी अचानक मुळासकट उन्मळून पडले. या झाडाखाली उभ्या करण्यात आलेल्या तीन ते चार दुचाकींचा चुराडा झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
काही दिवसापूर्वी याच भागातील कागदे सभागृहाजवळ एक झाड गटाराचे काम सुरू असताना कोसळले होते. पेंडसेनगर भागात असाच प्रकार यापूर्वी घडला होता. रस्ते, गटारे काम करताना झाडांच्या आजुबाजुला खोदले जाते. या झाडांची आधार मुळे तुटतात. झाडाच्या परिसरात खोदकाम केल्यानंतर तेथे अनेक दिवस गटार, रस्ते बांधणी केली जात नाही. त्यामुळे झाडाचा आधार निघून जातो. हळूहळू मुळे सैल होत जातात. झाड अचानक एक दिवस कोसळते, असे एका जाणकाराने सांगितले.
हेही वाचा…ठाणे : मांजरीच्या पिलाला जमिनीवर आपटून मारले
सुभाष रस्त्यावर मारुती मोटार ट्रेनिंग शाळेच्या जवळ जांभळाचे जुनाट झाड आहे. या झाडाच्या परिसरात रस्ता रुंदीकरण आणि भुयार गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामानंतर या भागातील जांभळाचे झाड रस्त्यावर कोसळले. या झाडाखालील तीन ते चार दुचाकींना चुराडा झाला. सुदैवाने या भागातून झाड कोसळताना कोणी पादचारी जात नव्हता. अन्यथा दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
झाड कोसळल्यानंतर सुभाष रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचा रांगा लागल्या. वाहनांनी गुप्ते रस्ता, गणेशनगर भागातून वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन पहिले झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला. तोपर्यंत अर्धा ते एक तासाचा कालावधी गेला. तोपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. झाड कोसळल्यानंतर या भागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी राहुल चौधरी, सुनील पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. स्वता रस्त्यावर उभे राहून कोसळलेल्या झाडाच्या परिसरात झालेली वाहतूक कोंडी सोडवली. या झाडाखाली ज्या दुचाकी वाहन मालकांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे राहुल चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा…सैफ आली खानचा हल्लेखोर बांगलादेशी निघताच आव्हाड यांच्यावर नरेश म्हस्के यांची टीका
एप्रिल, मे महिन्यात या जांभाळाच्या झाडाला जांभळांचा भर बहर यायचा. पहाटेच अनेक नागरिक रस्त्यावर पडलेली जांभळे वेचण्यासाठी येत असत. शाळकरी मुलांचा दिवसभर जांभळे खाण्यासाठी याठिकाणी राबता असायचा. एप्रिल ते मे अखेरपर्यंत हे जांभाळाचे झाड जांभळांनी लगडलेले असायचे. हे झाड कोसळल्याने जांभाळाच्या फळांना आता मुकावे लागेल, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.