आपण कल्याण येथे नवीन सोन्याची पेढी सुरू करत आहोत. दुकानात लावण्यासाठी सोन्याचे दागिने द्या. उद्घाटन झाले की ते दागिने दुसऱ्या दिवशी आणून देतो, असे खोटे सांगून कल्याणमधील वायलेनगर मधील दोन जणांनी डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील एका सराफाची ३५ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. दागिने नाहीच, पण त्याच्या बाजारमूल्याचे पैसेही दोघांनी परत न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सराफाने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

धनसुख पोपटलाल जैन (४०) यांचा डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर चिराग इमारतीत मॉडर्न हॉटेलच्या वरती दुसऱ्या माळ्यावर सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. धनसुख जैन यांच्या व्यवसायाची माहिती काढून कल्याणमधील वायलेनगर भागातील विश्वनाथ बाबुराव जगताप व त्याचा मामेभाऊ सागर अर्जुन साळुंखे हे धनसुख यांच्या डोंबिवलीतील दुकानात त्यांची फसवणूक करण्याच्या विचाराने आले. त्यांनी धनसुख यांना आम्ही सोन्याचे नवीन दुकान सुरू करत आहोत. सुरूवातीला दुकानात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दागिने नाहीत. तेव्हा दुकानाचे उद्घाटन होण्याच्या दिवसापुरते आपणास सोन्याचे दागिने देण्यात यावेत. यामधील काही दागिने आम्ही आकर्षक किमतीला विकतही घेणार आहोत, असे खोटे आमिष धनसुख यांना दाखविले.

दागिन्यांना चांगले गिऱ्हाईक मिळाले आहे. असा विचार करून विश्वनाथ, सागर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन धनसुख यांनी दुकानातील ६७८ ग्रॅम वजनाचे ३५ लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विश्वनाथ, सागर यांच्या ताब्यात दिले. उद्घाटन झाल्यानंतर दोघेही दागिने परत घेऊन येत नाहीत म्हणून धनसुख यांनी त्यांना संपर्क केला. ते सुरूवातीला दागिने घेऊन येतो असे सांगू लागले. विविध कारणे देऊन ते धनसुख यांना टाळू लागले. महिना उलटून गेला तरी विश्वनाथ, सागर आपले दागिने परत करत नाहीत. दागिने विकत घेण्याची भाषा करत नाहीत. त्यामुळे ते आपली फसवणूक करत आहेत. या दोघांनी नवीन दुकाने वगैरे सुरू केले नसल्याची माहिती सराफाला मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक आणि आपल्या पैशाचा अपहार विश्वनाथ जगताप, सागर साळुंखे यांनी केला आहे. याची जाणीव झाल्याने धनसुख जैन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. पी. सानप तपास अधिकारी आहेत.