कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पालिकेने गेल्या आठवड्यात एक टोल फ्री क्रमांक जाहीर केला. या क्रमांकावर आठवडाभरात डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, २७ गाव भागातून २४७ तक्रारी नागरिकांनी केल्या. या तक्रारींमधील १५५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, असा दावा पालिकेतर्फे करण्यात आला.

या तक्रारींमधील २७ तक्रारी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील रस्त्यावरील आहेत. पालिकेतर्फे दररोज पालिकेच्या १० प्रभाग हद्दीत दीड ते दोन हजार चौरस मीटरचे खड्डे भरले जात आहेत. १३ ठेकेदारांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत आहेत, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

जुलैमध्ये दरवर्षी सरासरी ५५५ मिलीमिटर पाऊस पडतो. यावेळी एक हजार १० मिलीमिटर पाऊस पडला. या संततधार पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अडथळे आले. तात्पुरत्या स्वरुपात खडी, पेव्हर ब्लाॅक टाकून वाहतूक सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. आता पावसाचा जोर ओसरला असल्याने कोल्ड मिक्स, रेडिमिक्सचा वापर करून खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत, असे अधिकारी म्हणाला.

टोल फ्री क्रमांक (०२५१)२२०११६८ सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्या दोन दिवसात नागरिकांनी खड्ड्यांच्या ८० तक्रारी पालिकेकडे केल्या होत्या.
पालिका हद्दीतील खड्ड्यांमुळे बांधकाम विभाग नागरिकांच्या रोषाला कारणीभूत झाला आहे. हा रोष कमी करण्यासाठी आता रात्रंदिवस कामे करून खड्डे भरणीची कामे पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता विभागाने प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनीही शहरातील खड्ड्यांसंदर्भात बांधकाम विभागाकडे विचारणा करून कोणत्याही परिस्थितीत खड्डे तातडीने भरण्याचे आणि नागरिकांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश दिले आहेत.

पालिका हद्दीतील डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील स्टार काॅलनी ते मानपाडा जंक्शन बुधाजी चौक, टाटा पाॅवर ते बंदिश पॅलेस, घरडा सर्कल, पेंढरकर महाविद्यालय ते सुयोग हाॅटेल रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. कल्याण शिळफाटा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे, डोंबिवली औद्योगिक, निवासी विभाग, काटई, बदलापूर रस्ता एमआयडीसीच्या अंतर्गत आहेत.

Story img Loader