डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील ह प्रभाग हद्दीत मारूती मंदिरा जवळ एका भूमाफियाने सात माळ्याची शिवनाथ कृपा नावाने बेकायदा इमारत चार वर्षापूर्वी उभारली. या इमारतीत निवास आणि पहिल्या माळ्यावर व्यायाम शाळा सुरू करून वाणीज्य वापर सुरू केला. या बेकायदा इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अंधारात ठेऊन भूमाफियाने तीन वर्षाच्या कालावधीत दोन लाख २५ हजार रूपयांची पाणी चोरी केली आहे.
पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या परवानग्या न घेता शिवनाथ कृपा इमारतीला २५ मिलीमिटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या माफियाने चोरट्या मार्गाने घेतल्या. अमोल श्याम कांबळे (४५) या भूमाफियाने ही बेकायदा इमारत उभारली आहे. शिवनाथ कृपा (निळकंठ विहारच्या बाजुला) या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून गेल्या तीन वर्षापासून निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर पालिका आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे अनेक तक्रार अर्ज करत आहेत. ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी या इमारतीच्या भूमाफियाला फक्त कारवाईच्या नोटिसा देऊन त्याची पाठराखण करण्यात धन्यता मानली आहे.
हेही वाचा…ठाणेकर कोंडीच्या विळख्यात; घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोंडी
ही इमारत बेकायदा असुनही या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आरसी जीम नावाने व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. शिवनाथ कृपा बेकायदा इमारतीचे काम अतिशय निकृष्ट पध्दतीने आणि घाईने पूर्ण करण्यात आली आहे. ह प्रभागातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून भूमाफिया अमोल श्याम कांबळे याने व्यायामशाळेबरोबर शिवनाथ कृपामधील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीदारांना दोन वर्षाच्या कालावधीत विकल्या. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता ही इमारत उभी राहिली असूनही अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त या इमारतीवर कारवाई करत नाहीत. तक्रारदार महेश निंबाळकर यांनी सोमवारी पालिका उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या जनता दरबारात अमोल कांबळे यांच्या शिवनाथ कृपा इमारतीच्या पाणी चोरीचा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी तातडीने याप्रकरणी चौकशी करून भूमाफिया अनोल कांबळेवर गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन निंबाळकर यांना दिले होते.
ह प्रभागाचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता उदय सूर्यवंशी सोमवारी शिवनाथ कृपा बेकायदा इमारतीत आले. त्यांनी या इमारतीच्या नळ जोडण्यांची तपासणी केली. अमोल कांबळे या भूमाफियाने फेब्रुवारी २०२१ ते जुलै २०२४ या कालावधीत २५ मीमी व्यासाच्या नळजोडण्यांमधून शिवनाथ कृपा बेकायदा इमारतीसाठी दोन लाख २५ हजार रूपयांची पाणी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पालिकेच्या संमतीविना, लबाडीने ही चोरी केल्याने उपअभियंता सूर्यवंशी यांनी अमोल कांबळे विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. उपनिरीक्षक ए. के. आंधळे तपास करत आहेत.
अशाच प्रकारची पाणीचोरी ह प्रभाग हद्दीतील राहुलनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी, जुनी डोंबिवलीत प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स, साईलिला, श्रीधर म्हात्रे चौकतील वसंत रेसिडेन्सी, ठाकुरवाडीतील शिवलिला, रेतीबंदर चौकातील तीन इमारतींमध्ये सुरू आहे.