लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण- डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची नव्याने नुतनीकरण केलेली अभ्यासिका ग्रंथसंग्रहालयाकडून काढून राजाश्रय लाभलेल्या एका वजनदार संस्थेला देण्याच्या जोरदार हालचाली सध्या महापालिका वर्तुळात सुरु आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने ४० लाखाचा खर्च करुन या ग्रंथसंग्रहालयाचे नूतनीकरण केले आहे. या कामासाठी डोंबिवलीतील एका बड्या राजकीय नेत्याने महत्वाची भूमीका बजावली होती. आता हे ग्रंथसंग्रहालय आपल्याच संस्थेला मिळावे यासाठी हा युवा नेता कमालिचा आग्रह धरु लागला असून महापालिका प्रशासनावरही दबाव वाढू लागल्याची जाहीर चर्चा येथील प्रशासकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मागील ४० वर्षापासून डोंबिवलीतील काही विचारी मंडळी अगदी समर्पित भावनेने डोंबिवली ग्रंथसंग्रहालय आणि तेथील अभ्यासिका चालवितात. मोक्याच्या जागी असलेल्या या ग्रंथसंग्रहलायच्या जागेवर काही राजकीय मंडळींची खूप आधीपासून नजर आहे. मात्र डोंबिवलीतील सुजाण रहिवाशांच्या एका मोठ्या वर्गाने अजूनही ही वास्तू राजकीय मंडळींच्या घशात जाऊ दिलेली नाही. या ग्रंथसंग्रहालयाची वास्तू मध्यंतरी फारस जर्जर झाली. त्यामुळे डोंबिवलीतील एका युवा नेत्याने या वास्तूच्या नुतनीकरणासाठी आग्रह धरला. महापालिकेनेही ४० लाख खर्च करुन जर्जर झालेली ही वास्तूचे नुतनीकरण केले. नुतनीकरण होताच हे ग्रंथसंग्रहालय खासगी संस्थेला चालविण्यास द्यावा यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव वाढू लागल्याची चर्चा असून नुतनीकरणासाठी आग्रह धरणारा नेताच यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याची चर्चा रंगली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या १५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी करून ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. अभ्यासविषयक सर्व सुविधांनीयुक्त अभ्यासिका पालिका आणि खासदार शिंदे, माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे कौतुक केले होते.
आणखी वाचा-घोडबंदर मार्गावर मेट्रो स्थानकाच्या निर्माणासाठी वाहतुक बदल
महापालिका वर्तुळात हालचाली
अभ्यासिकेची जागा स्वत:च्या संस्थेस मिळावी यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव वाढविला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात अगदी जाहीरपणे सुरु आहे. माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांच्या पुढाकारातून हे ग्रंथसंग्रहालय सुरू झाले होते. ते हयात असेपर्यंत या ग्रंथसंग्रहालयाच्या जागेवर कोणाचा डोळा नव्हता. आता ग्रंथसंग्रहालय चालकांना प्रभावी राजकीय पाठबळ नसल्याने काही स्थानिक मंडळी ग्रंथसंग्रहालयाची जागा हडप करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. काही पालिका अधिकारी खासगीत काही राजकीय मंडळी एका खासगी संस्थेला अभ्यासिकेचा ताबा देण्यासाठी आग्रही असल्याचे सांगत आहेत. या अभ्यासिकेवर पहिला हक्क ग्रंथसंग्रहालयाचा असल्याने खासगी संस्थेला पालिका इमारतीत किती शिरकाव करून द्यायचा याचा विचार काही पालिका अधिकारी करत आहेत.
अभ्यासिक बंदच
१५० आसनक्षमतेची अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थी जागे अभावी वाचनालयात, इमारतीच्या जिन्यावर बसून अभ्यास करत आहेत. जुन्या अभ्यासिकेचे प्रवेश शुल्क दरमहा १५० रूपये आहे. ते रास्त असल्याने अनेक विद्यार्थी येथे येतात. खासगी संस्थेचा दर चढा राहणार असल्याने या अभ्यासिकडे विद्यार्थी पाठ फिरवतील, असी भीती व्यक्त केली जाता आहे. डोंबिवलीतील साहित्य, संस्कृती, विचारी मंडळींनी मात्र कोणत्याही परिस्थितीत डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका खासगी संस्थेला देण्यात येऊ नय, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालिका आयुक्तांनी मात्र लवकरच ही अभ्यासिका खुली केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ग्रंथालयाचे विश्वस्त अभ्यासिकेचा ताबा मिळावा, या प्रयत्नात आहेत.
आणखी वाचा-कल्याण डोंबिवलीतील कचरा विल्हेवाटीचे ९९ कोटीचे प्रस्ताव मंजूर
उद्घाटनानंतर ग्रंथसंग्रहालयाच्या चालकांनी अभ्यासिकेचे काम करणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या ठेकेदाराकडे अभ्यासिकेच्या चाव्या मागितल्या. त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन नऊ महिने चावी देण्यास टाळाटाळ केली असल्याचे समजते. ग्रंथसंग्रहालय इमारतीची तळ मजल्याची जागा ग्रंथसंग्रहालयासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी चालकांनी एका लोकप्रतिनिधीकडे केली होती. त्याने एक लाख रूपये भाडे ग्रंथासंग्रहालय देण्यास तयार आहे का, असा प्रश्न चालकांना गप्प केले होते, असे समजते.
डोंबिवली ग्रंथसंग्रहालय अभ्यासिका बंद प्रतिक्रिया
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका लवकरच सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. मालमत्ता अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. एका खासगी ग्रंथालय संस्थेला अभ्यासिका देण्याचा घाट पालिकेकडून राजकीय दबावातून सुरू असल्याची चर्चा पालिकेत आहे.
“ डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या आताच्या अभ्यासिकेत ४० विद्यार्थी दाटीवाटीने बसतात. नवीन अभ्यासिकेचा पालिकेने ताबा दिला तर या वातानुकूलित अभ्यासिकेत एकावेळी १५० विद्यार्थी बसू शकतील. गरीब, गरजू घटकांमधील मुले अधिक संख्येने अभ्यासिकेत येतात. नऊ महिन्यापासून अभ्यासिकेचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ” -सतिश कुलकर्णी, अध्यक्ष, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय.