कल्याण– डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील उल्हास खाडी किनारी हरितपट्ट्यात भूमाफियांनी १० बेकायदा इमारतींच्या गृह प्रकल्पाची कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता उभारणी सुरू केली आहे. शहरातील एकमेव हरितपट्टा नष्ट होत असताना पालिकेकडून या बेकायदा इमारती भुईसपाट करण्याची कारवाई केली जात नाही. त्याचा निषेध म्हणून डोंबिवलीतील एका जाणकार नागरिकाने मुंबईतील आझाद मैदान येथे या बेकायदा बांधकामांचा विषय घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचा मंगळवारी आठवा दिवस आहे. विनोद गंगाराम जोशी असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. मागील काही वर्षापासून डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आवाज उठवून त्या भुईसपाट करुन घेण्यात जोशी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत रिजेन्सी इस्टेटमधील विकासकाच्या घरात चोरी
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील खंडोबा मंदिराजवळील शिव सावली या बेकायदा इमारती लगत भूमाफियांनी आठ माळ्याच्या बेकायदा इमारती उभारण्यास सुरुवात केली आहे. ३५० सदनिका या गृहप्रकल्पात आहेत. या इमारतीमधील शिव सावली प्रकल्पाला महारेराचा नोंदणी क्रमांक बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमाफियांनी मिळविला आहे. मेसर्स आदित्य इन्फ्राचे विकासक प्रफुल्ल गोरे, मे. निर्माण होम कन्स्ट्रक्शनचे मनोज सखाराम भोईर, त्यांचे भागीदार आदेश बिल्डर्सचे सिध्देश प्रदीप कीर, सिकंदर निळकंठ नंदयाल, कुलदीप रामकिसन चोप्रा यांच्या अर्थ साहाय्याने ही बांधकामे हरितपट्ट्यात सुरू आहेत. ६५ बेकायदा इमारत प्रकरणातील आरोपी मे. गोल्डन डायमेंशन या इमारतींचा वास्तुविशारद आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या भूमाफियांना यापूर्वी तपासासाठी बोलविले होते.
हेही वाचा >>> डोंबिवली पूर्वेत नेहरु रस्त्यावरील पदपथ दुकानदारांकडून बंद
ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी या बांधकामांवर कारवाई केली होती. त्यांच्यावर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले आहेत. तरीही माफियांनी पुन्हा या इमारती उभारणीचे काम सुरू केले आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. पालिका अधिकाऱ्यांकडून या बेकायदा इमारतींवर कारवाई होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि हरितपट्टयातील ही बेकायदा बांधकामे भुईसपाट करावीत या मागणीसाठी, या प्रकरणाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास प्रधान सचिव डाॅ. के. एच. गोविंद राज यांचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान येथे जोशी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
“ डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आश्वासन शासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून या इमारतीवर कारवाई होण्याची शक्यता नाही. शासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आपले उपोषण आहे.” विनोद जोशी उपोषणकर्ता, डोंबिवली.