डोंबिवली : शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वादानंतर पाच महिन्यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाला आहे. कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी नियुक्ती केली आहे.
होनमाने यांना तातडीने मानपाडा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारण्याचे आदेश कराळे यांनी दिले आहेत. शिवसेना-भाजपमधील वादामुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना तडकाफडकी शासन आदेशावरुन जूनमध्ये सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना प्रभारी पदभार देण्यात आला होता.
हेही वाचा : निरोगी राहण्यासाठी योगसाधना प्रभावी उपचार पध्दती, डोंबिवलीतील परिसंवादात तज्ज्ञ डाॅक्टरांची मते
औद्योगिक वसाहत, इतर विविध प्रकारचे व्यवसाय, सर्वाधिक वर्दळ, शिळफाटा रस्ता असा परिसर अखत्यारीत असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. आमदार प्रमोद पाटील यांनी मोक्याचे पोलीस ठाणे राजकीय वादामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविना ठेऊ नये, तेथे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी शासनाकडे केली होती.
राजकीय वाद
डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरुध्द एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने जूनमध्ये मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गु्न्हा कोणतीही शहानिशा न करता केवळ भाजपला, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बदनाम करण्यासाठी शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहावरुन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दाखल केला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असुनही बागडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यावर गु्न्हा दाखल केल्याने भाजप पदाधिकारी संतप्त होते.
हेही वाचा : ठाणे : टोल दरवाढीविरोधात मनसेचे उपोषण सुरूच, उपोषणाचा तिसरा दिवस
भाजप वरिष्ठांच्या आदेशावरुन बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून भाजपने शिवसेनेचे खासदार शिंदे यांना शह दिला. बागडे हे कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. मानपाडा पोलीस ठाण्यात असताना ते भाजप, मनसेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना अजिबात जुमानत नसल्याच्या तक्रारी होत्या. बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने खासदार शिंदे अस्वस्थ होते. भाजपने आपणास शह दिल्याचा राग त्यांच्या मनात राग होता. कोणत्याही परिस्थितीत बागडे यांना मानपाडा पोलीस ठाणे येथेच पुनर्नियुक्ती मिळावी यासाठी खासदार शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते. तर बागडे यांना पुन्हा मानपाडा येथे नियुक्ती देऊ नये यासाठी भाजप नेते प्रयत्नशील होते. या पदस्थापनेवरुन भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू होती.
हेही वाचा : बदलापूर: पालिका मुख्यालयाबाहेरच खड्ड्यांची आरास
बागडे यांना ठाणे पोलीस आयुक्तालय सोडून अन्यत्र कोठेही नियुक्ती मिळू नये यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील होते. बागडे याना डोंबिवली, कल्याण परिसरात नियूक्तीसाठी शिवसेनेचा प्रयत्न होता. अखेर शिवसेना-भाजप नेत्यांचे वरिष्ठ पातळीवर मनोमिलन झाले असल्याने बागडे यांना ठाणे येथे खंडणी विरोधी पथक आणि होनमाने यांना मानपाडा पोलीस ठाण्यात नियुक्त केले असल्याचे समजते.