ब्रिटिशांच्या २०० वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर येऊन ६० वर्षात काँग्रेसला जे देशहितासाठी करता आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात करुन दाखविले. करोना महासाथीच्या काळात भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आणल्याचे श्रेय गतिमान केंद्र सरकारला जाते. हेच अच्छे दिन आहेत, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी येथे माध्यमांना सांगितले.
कल्याण : आंबिवलीत रिक्षेच्या धडकेत दुचाकी वरील महिला गंभीर जखमी ; रिक्षा चालक फरार
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर मंत्री ठाकूर डोंबिवलीत आले आहेत. दिवसभरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी यांच्याशी संवाद झाला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. भाजप विरुध्द अनेक पक्ष, नेते आठ वर्षात एकत्र आले, पण मोदींच्या छबी, कार्यक्षमतेपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. दोन विरोधी लोक एका व्यासपीठावर येऊ शकत नाहीत, ते भाजपच्या संघटन शक्ती विरुध्द काय लढा देणार, असा प्रश्न मंत्री ठाकूर यांनी केला.देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्यांचे हित नजरे समोर ठेऊन विकास योजना राबविल्या जात आहेत. देशभरातील कोट्यवधी लोक या योजनांचा लाभ घेत आहेत. मोदींच्या या गतिमान कार्यपध्दतीमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप ३०३ चा आकडा पार करेल, असा विश्वास मंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला.
देशातील १४४ बिगर भाजप लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करुन तेथे पक्ष संघटना मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भाजप सोबत असलेल्या कोणत्याही पक्षाची जागा हिरावून घेण्याचा प्रयत्न नाही. या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्ते, सामान्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवर असलेल्या नागरी समस्या मार्गी लावणे हा मुख्य उद्देश आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.आतापर्यंत जनतेला जात, धर्मात अडकवून ज्यांनी राजकारण केले, तेच आता मोदींच्या विरोधात एकत्र येऊन संगीत खुर्चीचा खेळ खेळत आहेत. त्यांच्यात कोणतीही एकवाक्यता नसल्याने गेल्या आठ वर्षात ते मोदींसमोर निष्प्रभ ठरले आहेत, असे ठाकूर म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी ज्यांनी आतापर्यंत ब्रिटिस मानसिकतेत देश चालविला. ज्यांनी नेहमीच देश तोडण्याचेच काम केले. तेच आता टुकडे टुकडे गॅगचे सदस्य सोबत घेऊन यात्रा काढत आहेत. भारत तोडण्याची व्यूहरचना ज्या जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी आखली. ज्यांना राहुल गांधी मध्यरात्री जेएनयुमध्ये जाऊन भेटत होते, तेच आता यात्रेच्या अग्रभागी आहेत, अशी टीका मंत्री ठाकूर यांनी केली.यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, आ. कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.