डोंबिवली – येथील पश्चिमेतील देवीचापाडा येथील काळुबाई मंदिराजवळील कल्याण डोंबिवली पालिकेच्या विकास आराखड्यातील १५ मीटर रस्त्याला बाधा आणणारी सात माळ्याची बेकायदा इमारत बुधवारी ह प्रभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तोडकाम पथकाने भुईसपाट केली. पोलिस बंदोबस्ताविनाच ही कारवाई करण्यात आली. या कारवार्ईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
विकास आराखड्यातील रस्त्याला आपली इमारत अडसर आहे, याची जाणीव असुनही देवीचापाडा भागातील रहिवासी जितेंद्र उर्फ जितू हेंदऱ्या म्हात्रे, मुकेश म्हात्रे यांनी भागीदारी पध्दतीने गेल्या वर्षी या बेकायदा इमारतीचे काम सुरू केले. हा रस्ता पालिकेच्या बाह्य वळण रस्त्याचा पोहच मार्ग आहे. या बेकायदा इमारतीचे काम सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांनी पालिकेत तक्रारी केल्या होत्या. ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी कारवाईच्या नोटिसा देऊन इमारत अनधिकृत घोषित केली. परंतु त्यांनी ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई केली नाही. त्यानंतर सुहास गुप्ते यांनी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी ही बेकायदा इमारत उभारणारे जितू म्हात्रे यांच्यावर ‘एमआरटीपी’चा गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केला. या कारवाईमुळे या इमारतीचे काम मागील सहा महिने बंद होते. १५ दिवसापूर्वी भूमाफियांनी ही इमारत निवासयोग्य करण्यासाठी इमारतीचे प्लास्टर, आतील भिंती बांधण्याची कामे रात्रंदिवस हाती घेतली होती. ही नियमबाह्य कामे कोणाला दिसू नयेत म्हणून इमारतीच्या दर्शनी बाजुला हिरवी जाळी लावण्यात आली होती.
हेही वाचा >>>शहापूरजवळ दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांच्या बसला अपघात, औरंगाबाद येथील १४ शिंदे समर्थक शिवसैनिक जखमी
काळुबाई मंदिरा जवळील बेकायदा इमारतीचे काम नव्याने सुरू झाल्याच्या तक्रारी ह प्रभागाच्या विद्यमान साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी या इमारतीची पहाणी केली. दसऱ्यानंतर ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आश्वासन त्यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना दिले होते. बुधवारी सकाळी जेसीबी, कटर, ड्रील यंत्र घेऊन तोडकाम पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस बंदोबस्ताविनाच काळुबाई मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर कारवाई सुरू केली. ताफा दाखल होताच उपस्थित इमारत कामगार पळून गेले. पथकाने ही इमारत भुईसपाट केली. कारवाई सुरू होण्यापूर्वीच भूमाफिया घटनास्थळावरून पळून गेले. या कारवाईनंतर राहुलनगरमधील चार माफियांच्या, रेतीबंदर चौकातील अतिथी हाॅटेल समोरील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाकडून केली जाणार असल्याचे समजते.
“ देवीचापाडा काळुबाई मंदिराजवळील इमारत विकास आराखड्यातील रस्त्याला अडथळा आणत होती. पालिकेच्या परवानग्या न घेता या इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याने ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांच्या आदेशावरून करण्यात आली. ”- स्नेहा करपे,साहाय्यक आयुक्त,ह प्रभाग, डोंबिवली.