डोंबिवली : येथील शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा गृह प्रकल्पातील ॲड्रीना इमारतीच्या पंधराव्या माळ्यावरून उडी मारून एका ४२ वर्षाच्या नायजेरीयन नागरिकाने आत्महत्या केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या नागरिकाला तातडीने पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. त्याला डाॅक्टरांनी मृत्य घोषित केले.

अर्नेस्ट ओबीरथ (४२) असे मरण पावलेल्या व्यक्तिचे नाव आहे. त्यांच्या जवळील पारपत्रावर नायजेरीया अनमब्रा असा पत्ता आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या मृत्युप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचा पोलीस अभिलेखात उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा…महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलिसांनी सांगितले, लोढा पलावा गृह प्रकल्पातील ॲड्रीना इमारतीच्या डाऊन टाऊन भागात पंधराव्या माळ्यावर मयत अर्नेस्ट ओबीरथ आणि त्याचा मित्र एकेचुव्हू मडक्वे (४०) हे दोघे मित्र काही महिन्यांपासून एकत्र राहत होते. ते काय व्यवसाय, नोकरी करतात याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांना माहिती नव्हती. त्यांचे दैनंदिन येणेजाणे सोसायटीत सुरू होते. गुरुवारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अर्नेस्ट याने राहत्या सदनिकेच्या पंधराव्या माळ्यावरून खिडकीतून जमिनीवर उडी मारली. सुरक्षा रक्षकाला जमिनीवर काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला. त्याने जवळ जाऊन पाहिले तर सोसायटीतील एका व्यक्तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. तातडीने ही माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली. अर्नेस्टला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा…डोंबिवलीत सागावमध्ये मोटीराचा भोंगा वाजविला म्हणून मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी

दिवा, पलावा भागात अनेक नायजेरीयन नागरिक राहत आहेत. सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या लोकलमधून ते प्रवास करतात. साहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ बनसोडे तपास करत आहेत.