डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील एका सोसायटीतील महिलेने अडीच महिन्याच्या तान्ह्या मांजराच्या पिल्लाला मानगुटीला पकडले. त्या पिल्लाला ते सारखे ओरडते, घाण करते म्हणून इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून रागाच्या भरात तळमजल्या फेकले. जमिनीवरील लाद्यांवर आपटल्याने पिल्लाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात संबंधित महिलेच्या कृत्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या महिलेला नवीन फौजदारी कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्राणी प्रेमींनी केली आहे.
हेही वाचा..कशेळी खाडीत ठाणे महापालिका कचऱ्याचा भराव? कचऱ्याचा पुरवठा पालिका ठेकेदार करत असल्याचे उघड
डोंबिवलीतील फॅक्स फाऊंडेशन संस्थेच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा नरेंद्र रेडकर यांनी या मांजराच्या मृत्यूप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. मांजराला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून फेकून देण्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर मधील हिमालय आशीष समोरील सुंदरा पॅलेसच्या इमारत क्रमांक तीनमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. तक्रारदार रेखा रेडकर या सुंदरा पॅलेस सोसायटीच्या परिसरात आत्मज सोसायटीत राहतात.
पोलिसांनी सांगितले, सुंदरा पॅलेस सोसायटीच्या आवारात एक अडीच महिन्याचे मांजराचे पिल्लू वावरत होते. सोसायटी परिसरातील रहिवासी या मांजराच्या पिल्लाला खाण्यास देत असत. सोसायटी परिसरातील लहान मुले या मांजराच्या पिल्ला बरोबर खेळत असत. या पिल्ला माणसांचा लळा लागल्याने ते सारखे म्याॅव म्याॅव करत असे.
हेही वाचा..मुंब्य्राच्या डोंगरात पाच मुले वाट चुकली, मदत यंत्रणांनी शोध घेऊन केली सुटका
या पिल्लाचा सोसायटीतील वावर सहन न झाल्याने सुंदरा पॅलेसमध्ये राहणाऱ्या एक महिलेने या मांजराच्या पिल्लाचा कोणत्याही प्रकारे विचार न करता त्याला शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान मानेला पकडले. त्याला इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून मोकळ्या जागेत उभे राहून इमारतीच्या तळ मजल्यावरील जागेत फेकले. तळ मजल्याच्या जागेत काँक्रीटचा कोबा असल्याने ते कोब्यावर आपटल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच मरण पावले.
ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने ही माहिती तात्काळ फॅक्स फाऊंडेशनच्या रेखा रेडकर यांना दिली. रेडकर यांनी पोलीस विभागाला ई मेलव्दारे ही माहिती दिली. पोलिसांनी या ईमेलव्दारे आलेल्या माहितीची विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पाठविले.
हेही वाचा..कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
त्यावेळी तेथे त्यांना अडीच महिन्याचे एक मांजर मरून पडल्याचे दिसले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हा प्रकार करणाऱ्या एका अज्ञात महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक के. पी. कुमटकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.