डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, एमआयडीसी कार्यालय आणि या भागातील व्यापारी संकुलासमोर सकाळीपासून चारचाकी, दुचाकी वाहने दोन ते तीन रांगांमध्ये उभी केली जातात. डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारासमोरील मुख्य वर्दळीचा रस्ता सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीत अडकत असल्याने प्रवासी हैराण आहेत.
या भागात रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या, फेरीवाले यांचा व्यवसाय सकाळपासून चालतो. अरुंद असलेल्या या तिठ्यावरुन सावित्रीबाई फुले, एलआयसी कार्यालयाकडे, शिळफाटा रस्त्याकडे आणि घरडा सर्कलकडे रस्ता जातो. शिळफाटा रस्त्यावरुन डोंबिवलीत येणारी बहुतांशी वाहने या तिठ्यावरुन डोंबिवलीत येतात. या तिठ्याच्या एका बाजुला दोन सभागृह आहेत. वाहनांची प्रदर्शनी कार्यालये आहेत. याच आटोपशीर भागात वाहन दुरुस्तीचे कामे रस्त्यावर केली जातात. या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या वाहनांना दुतर्फाची वाहने अडथळा ठरत आहेत.
हेही वाचा >>> मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण
एमआयडीसी कार्यालयाच्या बाजुला एक व्यापारी संकुल झाले आहे. एक अद्ययावत सभागृह झाले आहे. या संकुलाच्या समोर खरेदीसाठी, मौजमजेसाठी इतर भागातून नागरिक येतात. त्यांची वाहने रस्त्यावर उभी असतात. घरपोच खाद्यपदार्थ देणारे वितरक या व्यापारी संकुलासमोर सकाळपासून आपल्या दुचाकी वाहनांसह ठाण मांडून असतात. ६० फुटाचा रस्ता आता वाहतुकीसाठी २० फुटामध्ये उपलब्ध असतो.
हेही वाचा >>> ठाणे पालिकेतील ४५ सफाई कामगारांना थकीत वेतन मिळणार
या तिठ्याच्या एका बाजुला दोन शाळा आहेत. या शाळांच्या बस, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा अशी गर्दी या तिठ्यावर होत असते. शिक्षक, विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. विविध भागातून महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक या भागात आपल्या खासगी वाहनातून या भागात येतात. आता घरडा सर्कलनंतर पेंढरकर महाविद्यालया जवळील तिठ्यावर दररोज कोंडी होत असते. शिळफाटा रस्त्याने सुसाट येणारा वाहन चालक आता डोंबिवलीत प्रवेश करताना पेंढरकर महाविद्यालय, घरडा सर्कलजवळ कोंडीत अडकत आहे.
ही कोंडी कायमस्वरुपी सोडविण्यासाठी पालिका, वाहतूक विभागाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींची वाहने या रस्त्यावरुन नियमित येजा करतात. त्यांनाही या कोंडीचा फटका बसत आहे.