डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी भागातील घरडा सर्कल ते के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा वाहन चालक दुचाकी, मोटारी उभ्या करून ठेवत आहेत. त्यामुळे दररोज या भागात सकाळ, संध्याकाळ वाहन कोंडी होते. पेंढरकर महाविद्यालय, घरडा सर्कल डोंबिवली शहरांचे प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारांवर रस्त्याच्या दुतर्फा वाहन मालक वाहने उभी करून ठेवत असल्याने या भागातील कोंडीने प्रवासी हैराण आहेत.
शिळफाटा, कल्याणकडून सुसाट येणारा वाहन चालक पेंढरकर महाविद्यालय रस्त्यावर आला की या भागात कोंडीत अडकून पडतो. या कोंडीतून घरडा सर्कलमार्गे डोंबिवलीत जाण्यासाठी काही वेळा प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास लागतो. घरडा सर्कल ते पेंढरकर महाविद्यालय दरम्यान रोटरी उद्यानआहे. या भागात उपहारगृह, स्टेशनरी दुकाने, पेंढरकर महाविद्यालय ते सावित्रीबाई फुले नाट्यगृह रस्ता दिशेने खाऊ गल्ली आहे. रस्त्याच्या कडेला दुतर्फा या भागात हातगाड्या उभ्या असतात. डोंबिवली परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी सकाळ, संध्याकाळ नाष्टा, भेळपुरी, पाणीपुरी खाण्यासाठी येतात. यामधील अनेक नागरिक रस्त्यावर वाहने उभी करून खाऊचा आस्वाद घेतात. हातगाडीच्या समोर दुचाकी, मोटारी, त्याच्या समोर खाऊसाठी उभे असलेले नागरिक असे चित्र घरडा सर्कल, पेंढरकर महाविद्यालय भागात असते. या कोंडीचा सर्वाधिक फटका डोंबिवलीत वाहनाने प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना बसतो.
पेंढरकर महाविद्यालय ते सावळाराम महाराज क्रीडासंकुलाजवळील विजय सेल्स दुकानापर्यंत हाॅटेल्स, खाऊच्या गाड्या लागतात. या उपहारगृहांमध्ये येणारे वाहन चालक उपहारगृहासमोर वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे दुकानासमोरील एक मार्गिका दुचाकी, मोटारांनी व्यापून जाते. मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना एकच मार्गिका उपलब्ध राहते. डोंबिवलीत बाहेर पडणारी वाहने पेंढरकर महाविद्यालय समोरील रस्त्याने सावित्रीबाई फुले नाट्यगृहमार्गे किंवा स्टेट बँक, नंदी पॅलेस हाॅटेलमार्गे इच्छित स्थळी निघून जातात. काही वाहने आर. आर. रुग्णालयावरून सुयोग हाॅटेल दिशेने जातात. ही सर्व वाहने पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल दरम्यानच्या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फाची वाहने, हातगाड्यांमुळे कोंडीत अडकतात. रोटरी उद्यानासमोरील रस्त्यावर एमआयडीसी कार्यालय ते घरडा सर्कल वाहने उभी असतात. आजदे कमान येथून टिळकनगर रस्त्याने जाताना रस्त्याच्या कडेला काही रहिवाशांनी काँक्रीट रस्त्यावर आपली वाहने उभी करण्यासाठी लोखंडी अडथळे उभे करून ठेवले आहेत. अवजड वाहन या भागातून जात असेल तर या भागात कोंडी होते. हे अडथळे काढण्याची नागरिकांची मागणी आहे.ॉ
हे ही वाचा…नागलाबंदर खाडी किनारा सुशोभिकरण कामाला महिनाभरात सुरुवात, दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार
रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या वाहनांना कोळसेवाडी वाहतूक विभागाने कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी आहे. या भागात आम्ही नेहमीच नियमबाह्य वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कारवाई करतो, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात कोंडी होणार नाही यादृष्टीने या भागात नियोजन केले जाईल. खास वाहतूक पोलीस तैनात केले जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.