दिवाळी सणानिमित्त गुरुवार, शुक्रवार डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर तरुणाईचा जल्लोष असतो. फडके रस्ता तरुणाईने गजबजून गेलेला असतो. या कालावधीत चेंगराचेंगरी किंवा अन्य कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी, तसेच विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी फडके रस्ता भागात ढोलताशा वादनास पोलिसांनी बंदी घातली आहे. असं असतांना डीजे लावून कार्यक्रमाला परवनागी देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ध्वनी मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या एका कार्यक्रमाला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढोलताशाला बंदी असं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे फडके रस्त्यावर वर्षानुवर्ष होणारे डीजे लावणे आणि त्या गाण्यांवरील नृत्याचे कार्यक्रम पार पडणार आहेत. आचारसंहितेमुळे पक्षीय नेते या कार्यक्रमात किती सहभागी होतात याविषयी अनेकांनी अनभिज्ञता दर्शवली. श्री गणेश मंदिर संस्थानने दिवाळी पहाट कार्यक्रम शांतते पार पडेल या दृष्टीने नियोजन केले आहे.
दरम्यान “दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त काही संस्था फडके रस्त्यावर डीजे लावून कार्यक्रम सादर करतात. या संस्थांनी ध्वनी मर्यादाचे पालन करून डीजे लावायचे आहेत. ध्वनी मर्यादेचे पालन, इतर कोणालाही कर्णकर्कश आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यायची आहे. आचारसंहितेचे पालन हा यात महत्वाचा विषय आहे” असं रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. तसंच त्यांनी डोंबिवली परिसरातील ढोलताशा पथकांना नोटीस पाठवून ढोलताशा वादन बंदीचे पालन करण्याचे सूचित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. फडके रस्ता, नेहरू रस्ता, अप्पा दातार चौक, मदन ठाकरे चौक भागात ढोलताशा वादनास बंदी असणार आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रस्त्यावर जमवून दिवाळी सणाच्या आप्तस्वकीय, मित्र, मैत्रिणींना शुभेच्छा देण्याची जुनी परंपरा आहे. डोंबिवलीसह बदलापूर, कल्याण, ठाणे, पलावा परिसरातून तरुण, तरुणी दिवाळी सण साजरा करण्यासाठी फडके रस्त्यावर येतात. या उत्साही तरुणांमुळे फडके रस्ता गजबजून जातो.
सन २०२३ मध्ये दिवाळी पहाटनिमित्त फडके रस्त्यावर तरुणांची गर्दी जमली होती. याचवेळी या रस्त्यावर ढोलताशा पथकांचे वादनाचे कार्यक्रम सुरू होते. हे ढोलताशा वादन बघण्यासाठी खूप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. हा प्रकार टाळण्यासाठी, तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी, परिसरातील शांततेचा भंग होऊ नये म्हणून दिवाळी पहाटच्या दिवशी फडके रस्ता परिसरात रामनगर पोलिसांनी ढोलताशा पथकांना वादनास बंदी केली आहे.
दिवाळी सण आनंदाचा दिवस आहे. या दिवशी कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडणे योग्य होणार नाही. ढोलताशा पथकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती करू नये. वादन बंदीच्या नोटिशीचा ढोलताशा पथकांनी भंग करू नये. तसा प्रकार कोणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीवर कारवाई केली जाईल. ही नोटीस न्यायालयीन पुरावा म्हणून अंमलात आणण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. फडके रस्ता भागात रुग्णालये आहेत. काही घरांमध्ये आजारी रुग्ण, लहान बाळ असतात. त्यांना ढोलताशा पथकांच्या कानठळ्या बसणाऱ्या वादनाचा सर्वाधिक त्रास होतो. अशा तक्रारी यापूर्वीच या भागातील नागरिकांंनी केल्या आहेत.
वाहतुकीस बंदी
फडके रस्त्यावर दिवाळी पूर्व संध्या, दिवाळी पहाट हे कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रस्त्यावरील वाहतूक नागरिकांच्या सोयीसाठी, फडके रस्त्यावरील उत्सवी कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पर्यायी मार्गाने वळवीली आहे.
फडके रस्त्यावरील बाजीप्रभू चौकातून आप्पा दातार चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्ता आप्पा दातार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. फडके रस्त्याकडे येणारी वाहने जोशी हायस्कूल, नेहरू रस्त्याने डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतील. एमआयडीसी परिसरातून डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने टिळक रस्ता, सावरकर रस्ता, इंदिरा चौकमार्गे रेल्वे स्थानकाकडे जातील.