डोंबिवली – दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री गणेश मंदिर संस्थानमधील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, तसेच मित्र, आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवली परिसरातील तरुणाईने फडके रोडवर गर्दी केली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक रंगाचे पेहराव करून तरुण, तरुणी फडके रोडवर दाखल झाली आहेत. पेहरावांमुळे रंगीबेरंगी झालेला फडके रोड उत्साह, आनंद, जल्लोष यांनी फुलून गेला आहे.
फडके रोडवरील बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक या तीनशे मीटरच्या पट्ट्यात फक्त तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. गळाभेटी, हस्तांदोलन करून मित्र-मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. फडके रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना वाहतूक पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. गणेश मंदिरसमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. आपल्या कुटुंबीयांसह मंडळी फडके रोडवर दाखल झाली आहेत. ज्येष्ठ मंडळी, तरुण, तरुणींच्या गणेश मंदिरासमोर गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. चिमुकली, बालगोपाळ मंडळी आकर्षक पेहरावात या आनंदात सहभागी झाल्याचे दृश्य आहे.
दिवाळी सणाच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वाहनांची गणपतीच्या साक्षीने गणेश मंदिरासमोर गुरुजींकडून पूजाअर्चन करण्यासाठी वाहन मालकांची धावपळ सुरू आहे. अनेक नवीकोरी वाहने पूजाअर्चनासाठी रांगेत उभी आहेत. यामध्ये दुचाकी, मोटारींचा समावेश आहे. फडके रोडवर दोन दिवसांपूर्वीच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. काही कुटुंबीयांनी आपल्या घरातील पाळीव श्वान आकर्षक पेहराव करून फडके रस्त्यावर आणले आहेत.
फडके रोडवर वाहनांना प्रतिबंध असल्याने परिसरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर खरेदी केलेली वाहने आपल्या मित्र परिवाराला दाखविण्यासाठी अनेक तरुण, तरुणी नव्या कोऱ्या वाहनासह फडके रस्त्यालगतच्या छेद रस्त्यावर दाखल झाली आहेत. या नव्या वाहनांभोवती नव्या वाहन मालक तरुणाचे कौतुक करण्यासाठी तरुण, तरुणींच्या झुंडी दिसत आहेत.
अंबिका हाॅटेल भागात डीजेचा दणदणाट सुरू आहे. या वाद्याच्या तलावर तरुणाई थिरकताना दिसत आहे. आप्पा दातार चौकात गणेश मंदिर आयोजित नृत्याचे कार्यक्रम सुरू आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी फडके रोडवर पोलीस, वाहतूक पोलीस तैनात आहेत. अग्निशमन दलाचे वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रोडवर भेटल्यावर मित्रत्वातील रेशीम बंध अधिक घट्ट होतात. फडके रोडवरील भेटीतून अनेकांचे प्रेमाचे बंध अधिक घट्ट झाले, असे मानले जाते. त्यामधून तरुण, तरुणींचे विवाह झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या कारणांसाठीही फडके रोडची सर्वदूर चर्चा आहे.
विदेशातून सुट्टीनिमित्त डोंबिवलीत आलेला जुनाजाणता कार्पोरेट आपल्या जुन्या आठवणी जागविण्यासाठी कुटुंबासह फडके रोडवर आवर्जून दाखल होतो. फडके रोडवर हजेरी लावल्यावर येथील जुन्या हाॅटेलमधील चहा-नाष्ट्याची चव चाखून मगच बहुतांशी जण घरचा रस्ता धरतात. फडके रोड परिसरातील चहाच्या ठेल्यांवर चहा, काॅफी, उकाळ्यासाठी, वडापावच्या गाड्यांवर गर्दी आहे. पोलिसांनी आवाहन करूनही फटाके विक्रेत्यांनी मात्र आपली दुकाने फडके रोडवरून हटविली नसल्याचे दृश्य आहे. आचारसंहिता असल्याने राजकीय मंडळी गाजावाजा न करता आप्पा दातार चौकातील कार्यक्रमात उपस्थिती लावून काढता पाय घेत आहेत.