डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील बापुसाहेब फडके रस्त्यावर शुक्रवारी आप्पा दातार चौक भागात गुलमोहराचे एक जुनाट झाड अचानक कोसळले. सुदैवाने जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. फडके रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर अचानक झाड कोसळल्याने काही वेळ वाहनांची कोंडी झाली.

फडके रस्त्यावर लक्ष्मी पीठ विक्री दुकानाच्या बाजुला गुलमोहराचे एक २५ ते ३० वर्षापुर्वीचे जुनाट झाड होते. अलीकडेच या झाडाला पालवी फुटली होती. लाल गर्द फुलांनी हे झाड दरवर्षी बहरते. यावेळीही पाऊस सुरू होण्यापूर्वी हे झाड लाल फुलांनी बहरण्याच्या प्रतिक्षेत परिसरातील नागरिक होते. तत्पूर्वीच हे गुलमोहराचे झाड कोसळल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. उन्हाळा, पावसाळ्यात हे गुलमोहराचे झाड नागरिकांना सावली, उन्हासाठी मोठा आडोसा होते.

हे झाड अचानक कोसळेल अशी कोणतीही शक्यता नसताना शुक्रवारी सकाळी वादळवारा नसताना गुलमोहराचे झाड अचानक सकाळच्या वेळेत कोसळले. सकाळच्या वेळेत या रस्त्यावर रिक्षा, खासगी वाहने, श्री गणेश मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी असते. अशा परिस्थितीत झाड कोसळत असताना या भागात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. झाडाच्या दोन्ही बाजुला रांगेत दुकाने आहेत. रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने कोणत्याही इमारत किंवा दुकानाचे झाड कोसळल्याने नुकसान झाले नाही.

झाड पडताच पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, नेहरू मैदान, एमआयडीसी, पाथर्ली भागातून प्रवासी घेऊन येणारे रिक्षा चालक, खासगी वाहने आप्पा दातार चौकात अडकून पडली. ही सर्व वाहने गणेश मंदिरावरून नेहरू रस्त्याने डोंबिवली रेल्वे स्थानक, तेथून फडके रस्त्यावर आली. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून आप्पा दातार चौकाकडे जाणारी वाहने अडकून पडल्याने ही वाहने सावरकर रस्ता, ब्राह्मण सभा टिळक रस्त्यावरून इच्छित स्थळी निघुन गेली.

झाड पडल्याची माहिती डोंबिवली अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी येऊन झाड तोडण्याची कारवाई सुरू केली. वाहतुकीला अडथळा होणारा भाग पहिले जवानांनी मोकळा केला. या झाडाच्या फांद्या, खोड यांचे तुकडे करून ते फडके रस्त्यावरील वाहतुकीला, पादचारी, व्यापाऱ्यांना अडथळा येणार नाही म्हणून उचलून नेण्यात आले. फडके रस्त्यावरची जुनाट झाडे ही फडके रस्त्याची शान आहे. ही झाडे हळूहळू कोसळू लागल्याने स्थानिक रहिवासी, व्यापारी खंत व्यक्त करत आहेत. आम्ही मागील तीस वर्ष दुकानात आलो की झाड लहान असताना त्याला पहिले पाणी टाकून मग दुकानातील व्यवहार सुरू करायचो. आमच्या समोर ही झाडे लहानाची मोठी झाली आहेत. ती झाडे कोसळू लागल्याने वाईट वाटते, अशी खंत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.