डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत रेल्वे मैदानाजवळील गणेशनगरमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एक महिन्यापासून एका भूमिगत जलवाहिनीमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यामुळे एक महिन्यापासून या भागात दररोज वाहन कोंडी होत आहे. शाळेच्या बस, अवजड डम्पर समोरासमोर आल्या की कोंडीत आणखी भर पडते.

या रस्त्याच्या एका बाजुला मुख्य वर्दळीच्या रस्त्यात वाहन दुरुस्तीची कार्यशाळा, दुसऱ्या बाजुला एका इमारतीची संरक्षित भिंत आहे. वाहन दुरुस्ती कार्यशाळा आणि संरक्षित भिंतीच्या मध्ये रस्त्याच्याकडेला हा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून रस्ता रोधक लावण्यात आला आहे. सकाळ, संध्याकाळ या रस्त्यावरील वाहन संख्या वाढली की या भागात वाहन कोंडी होते. सकाळच्या वेळेत अनेक शाळांच्या बस या रस्त्यावरून विद्यार्थी वाहतूक करतात. त्यांना येथील कोंडीचा अधिकचा फटका बसतो.

डोंबिवली पूर्व भागातून पश्चिमेतील गणेशनगर, चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा भागाला पाणी पुरवठा करणारी भूमिगत जलवाहिनी या भागातील सरस्वती इमारतीच्या (जुनी सरस्वती विद्यामंदिर) जवळून गेली आहे. या जलवाहिनीला सतत हवा (एअर) पकडत असल्याने गणेशनगर परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, असे पालिका पाणी पुरवठा अभियंत्यांनी सांंगितले. जलवाहिनीत असलेली हवा हळूहळू निघून जावी, या उद्देशातून भूमिगत जलवाहिनी दिसण्यासाठी आणि ती मोकळी राहावी म्हणून हा खड्डा खोदण्यात आला आहे. या जलवाहिनीची हवाविषयक चाचणी यामाध्यमातून घेतली जात आहे. गणेशनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला त्यामधील हवेमुळे (एअर) पाणी पुरवठ्यात अडसर येतो की अन्य काही कारण आहे, याची तपासणी पालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंते करत आहेत. या चाचणीसाठी ही जलवाहिनी काही दिवसांपासून खुली ठेवण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या चाचणीतील निष्कर्ष पाहून या जलवाहिनीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. जलवाहिनीतील बिघाड निदर्शनास आला की तात्काळ हे काम हाती घेऊन ते पूर्ण केले जाणार आहे, असे अभियंत्याने सांगितले.

खड्डा खोदलेल्या ठिकाणी एक रस्ता गणेशनगर, एक रस्ता चिंचोड्याचापाडा, पेट्रोलपंप दिशेने जाणारा आहे. खड्ड्याजवळ दोन्ही कडे जाण्यासाठी फाटा आहे. ठाकुर्ली पुलाकडून येणारी वाहने, पेट्रोल पंप दिशेने येणारी जाणारी वाहने, गणेशनगरकडून सुभाष रस्ता भागात जाणारी वाहने या खोदलेल्या खड्डा भागात आली की या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.

गणेशनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या भूमिगत जलवाहिनीमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे. या जलवाहिनीतील बिघाडाची चाचणी घेऊन येथील भूमिगत जलवाहिनीसंदर्भात निर्णय घेणार आहोत. बिघाड निदर्शनास आला की तात्काळ हे काम पूर्ण करणार आहोत. उदय सूर्यवंशी उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, ह प्रभाग.

Story img Loader