डोंबिवली: डोंबिवली पूर्व फलाट क्रमांक एकवरील दिनदयाळ चौक भागातील रेल्वे आरक्षण केंद्र आणि रेल्वे प्रवासी तिकीट खिडकी सुविधा फलाट क्रमांक एकवरच कल्याण बाजुला सुरू करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यापासून नवीन जागेत हे केंद्र उभारण्याचे काम रेल्वेकडून सुरू होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली रेल्वे स्थानकात क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचच्या दरम्यान पूर्व-पश्चिम दिशेने एक पादचारी पूल उभारण्याचे काम रेल्वेकडून प्रस्तावित आहे. हे काम मागील सहा महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. या पादचारी पुलामुळे डोंबिवली पूर्व रामनगर भागातील प्रवासी डाॅ. राॅथ रस्त्यावरून पादचारी पुलावर येतील आणि तेथून ते पश्चिमेतील पंडित दिनदयाळ चौक किंवा रेल्वे समांतर महात्मा गांधी रस्त्यावर उतरतील.

हेही वाचा : ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन आणि डोंबिवली रेल्वे स्थानकातील दिवा बाजूकडील शेवटचा पादचारी पूल जुना झाल्याने या नवीन पादचारी पुलाची उभारणी करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. या पादचारी पुलाच्या कामात रेल्वे फलाटावरील दिनदयाळ चौक भागालगतची रेल्वे आरक्षण केंद्रे आणि प्रवासी तिकीट खिडकी बाधित होत होती. पादचारी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत आरक्षण केंद्र आणि रेल्वे प्रवासी तिकीट खिडकी स्थलांतरित करणे गरजेचे होते. त्यामुळे रेल्वेने ही दोन्ही केंद्रे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील कल्याण बाजुकडील दिशेला सुरू केली आहेत.

दोन दिवसांपासून ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या तिकीट खिडक्यांमुळे पंडित दिनदयाळ रस्त्याने येणाऱ्या प्रवाशाला रेल्वे तिकिटासाठी आता विष्णुनगर रेल्वे तिकीट खिडकी भागात जावे लागणार आहे. काही महिने हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. फलाट क्रमांक एकवर आता विष्णुनगर, दिनदयाळ चौक भागातील तिकीट खिडक्या, स्वयंचलित तिकीट सेवा सयंत्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना मुबलक रेल्वे तिकीट खिडक्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये वाशी बसमध्ये चढताना तीन भामट्यांनी प्रवाशाला लुटले

जुने आरक्षण केंद्र बंद करून नवीन जागेत ते सुरू करण्यात आले आहे. याची कोणतीही माहिती रेल्वेने प्रवाशांना दिलेली नाही. किंवा जुन्या आरक्षण केंद्राच्या ठिकाणी जागा बदलाचा फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचा सध्या गोंधळ उडत आहे. रेल्वेने उदघोषणा करून डोंबिवली फलाट क्रमांक एकवरील आरक्षण केंद्र फलाट एकवर नवीन जागेत स्थलांतरित केले आहे, अशी माहिती देण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli railway station deendayal chowk railway reservation center shifted to platform one css