डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान रेल्वे मार्गालगत चार ते पाच फुटाचे लोखंडी रोधक उभे केले आहेत. तरीही अनेक प्रवासी स्वताच्या जीवाची पर्वा न करता लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गात उड्या मारून लोखंडी रोधक ओलांडून लोकल पकडण्यासाठी धडपड करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दररोज सकाळ, संध्याकाळ हा प्रकार गर्दीच्या वेळेत सुरू असतो. अनेक प्रवासी हे लोखंडी रोधक ओलांडताना पडतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवान, स्थानक व्यवस्थापक तैनात असतात. तरीही त्यांच्याकडून या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होत नसल्याने अनेक प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : डोंबिवलीतील आजदेपाड्यात तलवारी घेऊन तरुणांची दहशत

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी फलाट क्रमांक पाचवरून मुंबईला जाणारी अतिजलद लोकल पकडण्यासाठी सकाळच्या वेळेत उभे असतात. यावेळी अतिजलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावण्याची उद्घोषणा झाली तर प्रवासी तात्काळ रेल्वे मार्गात उड्या करून लोखंडी रोधक ओलांडून फलाट क्रमांक तीन वर येणारी धीमी लोकल पकडण्यासाठी धावपळ करतात. फलाट क्रमांंक तीनवरील प्रवासी जलद लोकल ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दिसत असताना रेल्वे मार्गात उड्या मारून डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर येणारी लोकल पकडण्याची प्रयत्न करतात.

हेही वाचा : पावसाचे पाणी उपसण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात पाणी उपशाचे तीन पंप

तसेच, अनेक प्रवासी जिने चढायला लागू नये म्हणून रेल्वे मार्ग ओलांडून पूर्व, पश्चिम भागात जातात. रेल्वे मार्गातील लोखंडी रोधक उंच असल्याने अनेक वेळा प्रवाशांना त्या रोधकावरून उड्या मारून पलीकडे जाता येत नाही. म्हणून प्रवाशांनी रोधकावरून उडी मारण्यासाठी लोखंडी रोधकाजवळ मोठे दगड, काँक्रिटच्या गोणी आणून ठेवल्या आहेत. या गोणी, दगडावर पाय ठेवला की लोखंडी रोधकावरून अलगद पलीकडे जाता येते. रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक वेळा फलाट क्रमांक पाच, चारवरून मेल, एक्सप्रेस, मालगाड्या धावत असतात. ठाकुर्ली ते डोंबिवली, कोपर, दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे प्रवासी मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli railway station passengers crowd to get on the local trains css
Show comments