डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजूकडील फलाट क्रमांक एक ए वरील सरकता जिना आणि स्कायवाॅकची उतार पायवाट प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारपासून बंंद केली आहे. प्रवाशांनी या बंद सरकता जिना, पायवाट ऐवजी उत्तर बाजूकडील सरकते जिने, उतार पायवाटचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचपर्यंत पादचारी पूल उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. एप्रिल-मे मध्ये ही कामे सुरू करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने पादचारी पुलाचे काम करताना आणि फलाटावरील प्रवाशांना या कामामुळे हालचाली करणे अवघड होत होते. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे काम चार महिने बंद ठेवले होते.

हेही वाचा : “आपलं ठरलयं…महायुतीच्या उमेदवारांचे काम करा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

आता हे काम नव्या जोमाने सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी या पादचारी पुलाच्या मार्गातील डोंबिवली पश्चिमेकडील तिकीट खिडकी, तिकीट आरक्षण केंद्र फलाटाच्या दुसऱ्या भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. या कामात फलाट क्रमांक एक ए वरील सरकता जिना, स्कायवाॅकला जोडून असलेली उतार पायवाट अडथळा येत होती. त्यामुळे पुलाच्या कामासाठी हे दोन्ही प्रवासी मार्ग रेल्वे प्रशासनाने बुधवारपासून (ता.६ नोव्हेंबर) बंद करण्याचा निर्णय घेतला.

फलाट क्रमांक एक एवर उतरणाऱ्या प्रवाशांनी दिवा बाजूकडील जिन्यावरून न जाता उत्तर दिशेकडील कल्याण बाजुकडील जिना, स्कायवाॅकने इच्छित स्थळी जावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या सरकता जिना, उतार पायवाटवरून प्रवासी पश्चिम रेल्वे स्थानकात भागात येजा करत होते. फलाट क्रमांक एक एच्या दोन्ही बाजुला सरकते जिने, उतार वाट असल्याने गर्दीचे विभाजन होत होते.

हेही वाचा : भाजपचे कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांची हकालपट्टी

फलाट एक एवर आता प्रवाशांना एकच मार्गिका येण्या जाण्यासाठी उपलब्ध असल्याने या भागात गर्दी, चेंगराचेंगरा होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने सकाळ, संध्याकाळ फलाट क्रमांक एक एवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा जवान तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण करावे,अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli railway station platform 1a elevator closed due to railway bridge work css