डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडील पादचारी पुलांना जोडणाऱ्या फलाट क्रमांक तीन आणि चार वरील जिन्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबरपासून मध्य रेल्वेकडून सुरू केले जाणार आहे. या कामामुळे हा जिना पुढील ४० दिवस प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ३० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून या जिन्यांचा वापर प्रवाशांसाठी बंद केला जाणार आहे.
हेही वाचा : स्टेडियम उभारणीसाठी डोंबिवली जीमखान्याला २५ कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
या दुरुस्तीच्या कालावधीत प्रवाशांनी कल्याण किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस बाजुकडील डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यांचा वापर फलाट क्रमांक तीन किंवा चारवर चढ, उतार करण्यासाठी करावा, तसेच, प्रवाशांनी फलाटावरून पादचारी पुलावर चढणे किंवा उतरण्यासाठी या भागातील सरकत्या जिन्यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेच्या वरिष्ठ बांधकाम अभियंत्याने केले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सकाळ, संध्याकाळची वाढती गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा जवानांना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि या भागात होणारी प्रवाशांची झुंबड विचारात घेऊन येथील पाचचारी पुलावर सकाळ, संध्याकाळ तैनात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील आरक्षित भूखंडांचा खासगीकरणातून विकास करा – आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मुंबईकडे धावणाऱ्या धिम्या किंवा जलद लोकल धावतात. त्यामुळे या फलाटावार पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी असते. फलाट क्रमांक चारवरून मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. संध्याकाळच्या वेळेत मुंंबईतून कामावरून निघालेला बहुतांशी नोकरदार जलद लोकलना पसंती देतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत फलाट क्रमांक चारवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या प्रवाशांना रविवार नंतर डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन किंवा चारवर उतरल्यानंतर कल्याण बाजू किंवा सीएसएमटी बाजूकडील सरकात जिना, नियमितच्या जिन्याने इच्छित स्थळी जावे लागणार आहे. प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी जिन्यावरून जाताना झुंबड करू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.