डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके छेद रस्त्यावरील फत्ते अली रस्त्याच्या एका भागात सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याचा एक भाग बंद करण्यात आला आहे. एका भागात काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदार करत आहे. या संधीचा गैरफायदा घेत दुचाकी चालक आपली वाहने रस्ता बांधून पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्यावर आणून उभी करत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना या भागातून चालणे अवघड झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून फत्ते अली रोड आणि नेहरू रस्ता, फडके रस्ता भागात हा प्रकार सुरू आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असले की ठेकेदाराकडून रस्त्याचे दोन्ही भाग बंद केले जातात. परंतु फत्ते अली रस्त्यावर काम झालेल्या भागातील काँक्रिटीकरणाचा भाग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालक या भागात दुचाकी आणून उभ्या करतात. या दुचाकींमुळे या रस्त्यावरील व्यापारी, खासगी शिकवणी वर्गाचे चालक, बँक ग्राहक त्रस्त आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठेतील हा रस्ता आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना या भागातून चालणे अवघड झाले आहे. अनेक नागरिकांनी याप्रकरणी डोंबिवली वाहतूक विभागाकडे, ठेकेदार, पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्याची कोणीही दखल घेत नाही. वाहतूक विभागाकडील टोईंन व्हॅन मागील काही महिन्यांपासून बंद आहे. या बेकायदा वाहनतळावरील दुचाकी उचलणे वाहतूक पोलिसांना शक्य होत नाही.
नेहरू रस्त्यावरून फत्ते अली रस्ता, के. बी. विरा शाळेकडे जाण्यासाठी दुचाकी वाहन चालक फत्ते अली रस्त्याचा उपयोग करतात. विरा शाळेकडून येणारी वाहने याच रस्त्याने नेहरू रस्त्याकडे जातात. रिक्षा वाहनतळ या भागात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील बेकायदा वाहनतळामुळे नागरिक हैराण आहेत. पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला रस्त्याची एक बाजू पूर्ण होईपर्यंत रस्ता बंद करण्याची सूचना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
फत्ते अली रस्त्यावर अनेक दुचाकी चालक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात ठेकेदाराला रस्ते काम करताना रस्त्याची दोन्ही बाजू बंद करून रस्ता पूर्ण करण्याची सूचना करण्यात येत आहे. या रस्त्यावर पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा पध्दतीने दुचाकी उभ्या केल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात येत आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.