डोंबिवली पश्चिमेत रेल्वे प्रवेशव्दारावर अडवून रिक्षा चालकांकडून प्रवासी वाहतूक
डोंबिवली: डोंबिवली पश्चिम विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्या समोरील रेल्वे प्रवेशव्दारावर रिक्षा आडव्या लावून अनेक रिक्षा चालक दररोज सकाळी ते रात्री उशिरापर्यंत प्रवासी वाहतूक करतात. महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर वाहन कोंडी होते. प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाताना अडथळे येत आहेत. रस्ता, प्रवेशव्दार अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना अनेक प्रवासी रिक्षा रिक्षा वाहनतळावर उभ्या करुन प्रवासी वाहतूक करा, असे सांगतात. त्यावेळी ‘रस्ता आमच्या मालकीचा आहे. तुम्ही आम्हाला बोलणारे कोण,’ अशी उर्मट उत्तरे रिक्षा चालकांकडून प्रवाशांना देण्यात येत आहेत.
एखाद्या प्रवाशाने एखाद्या रिक्षा चालकाशी रिक्षा बाजुला करण्यावरुन वाद घातला तर त्या इतर रिक्षा चालक तात्काळ संघटित होऊन वाद घालणाऱ्या प्रवाशाला घेरण्याचा प्रयत्न करतात. अनेक दिवसांपासून हा प्रकार डोंबिवली पश्चिम विष्णुनगर रेल्वे प्रवेशव्दारासमोर सुरू आहे. रेल्वे प्रवेशव्दारावर प्रवासी वाहतूक करणारे बहुतांशी रिक्षा चालक हे मुरबाड तालुक्यातील (मुरबाडी) बेरोजगार तरुण आहेत. ते डोंबिवलीत येऊन मूळ रिक्षा मालकांच्या रिक्षा भाड्याने चालविण्यास घेतात. दररोज मालकाला प्रवासी भाड्यातून मिळालेली ठरावीक रक्कम हे चालक देतात. जास्तीची रक्कम हातात पडावी म्हणून हे रिक्षा चालक महात्मा फुले रस्ता, दिनदयाळ रस्ता, गुप्ते रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर न जाता रेल्वे प्रवेशव्दारावर उभे करुन प्रवास करतात, असे रिक्षा वाहनतळांवरील रिक्षा चालकांनी सांगितले.
रिक्षा वाहनतळावर रिक्षांची मोठी रांग असते. अनेक वेळा अर्धा ते पाऊण तास प्रवाशांसाठी प्रतीक्षा करावी लागते. एवढा वेळ प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून ‘मुरबाडी’ रिक्षा चालक रेल्वे प्रवेशव्दार अडवून प्रवासी वाहतूक करतात. रेल्वे प्रवेशव्दारावर मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दोन ते तीन रांगांमध्ये रिक्षा उभ्या करण्यात येत असल्याने दिनदयाळ चौकातून भावे सभागृहा वरुन ठाकुर्ली उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या आणि ठाकुर्ली पुलाकडून दिनदयाळ चौक, मोठागावकडे जाणाऱ्या वाहनांना रेल्वे प्रवेशद्वारावरील रिक्षा चालकांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.
हेही वाचा >>> ठाणे: चोरट्यांकडून एकाची पाचव्या मजल्यावरून धक्का देऊन हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक
वाहतूक पोलीस रेल्वे प्रवेशव्दारावर आले की हे रिक्षा चालक पळून जातात. गेल्या दोन वर्षात अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही हे रिक्षा चालक नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे स्थानक भागात रिक्षा चालकाने वाहनतळांवर उभे राहूनच प्रवासी वाहतूक करावी. जे रिक्षा चालक वाहनतळ सोडून अन्य भागात, रस्त्यांवर व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. दुपारच्या वेळेत वाहतूक पोलीस भोजनासाठी गेले की त्या कालावधीत काही रिक्षा चालक रेल्वे स्थानक भागात वाहनतळ सोडून येऊन प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा रिक्षा चालकांचा सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
” रिक्षा चालकांवर कोणाचा वचक आहे की नाही. काही रिक्षा चालक दररोज डोंबिवली पश्चिमेचे विष्णुनगर रेल्वे प्रवेशद्वार अडवून व्यवसाय करतात. या रिक्षा चालकांमुळे रेल्वे स्थानकात जाताना दररोज अडथळा येतो. अशा चालकांवर पोलिसांनी कारवाई करावी.”
– चित्रा जोशी, प्रवासी
” रिक्षा संघटनांशी संबंधित सर्व रिक्षा चालक रिक्षा वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक करतात. जे रिक्षा चालक रस्ते, प्रवेशद्वार अडवून व्यवसाय करतात. त्यांच्या वाहतूक पोलीस, आरटीओने कारवाई करावी. कोणतीही रिक्षा संघटना त्यात हस्तक्षेप करणार नाही.”
– शेखर जोशी, रिक्षा संघटना पदाधिकारी