डोंबिवली- आम्ही तुमच्या घरातील सर्व सामान व्यवस्थित बांधून स्थलांतरित होणाऱ्या नवीन घरच्या ठिकाणी घेऊन जातो, असे आश्वासन एका वृध्द महिलेला सामान वाहू कंपनीच्या तीन कामगारांनी दिले. घरी येऊन त्यांनी सामान बांधणीचे निमित्त करुन वृध्द महिलेच्या घरातील किमती ऐवज, सामानाची चोरी करुन, सामान वाहतुकीचा खर्च म्हणून एकूण १५ हजार रुपये उकळून पळून गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीतील टाटा पाॅवर हाऊस जवळील देशमुख होम्स गृहसंकुलातील वर्धमान सोसायटीत हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आहे. महिलेने घरातील आलेल्या कामगारांनी बंदिस्त केलेले सामान उघडून पाहिले तेव्हा त्यात घरातील आवश्यक गोष्टी नव्हत्या. सोने, चांदीचा ऐवज चोरीला गेला होता. कामगारांनी घरातील सामानाची चोरी केल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. मानपाडा पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण: ५४ दिवसांच्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला यश, शिळफाटा रस्ता बाधितांना भरपाई देण्याच्या हालचाली?

पोलिसांनी सांगितले, रंजनी रामन (६७) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या घरातील सामान दुसऱ्या नवीन घरी स्थलांतरित करायचे होते. यासाठी रंजनी यांनी बेस्ट पॅकर्स ॲन्ड मुव्हर्स या सामान वाहू एजन्सीला संपर्क केला. त्यांनी घरातील सामानाची योग्य बांधबंदिस्ती करुन आम्ही सामान योग्य ठिकाणी स्थलांतरित करू असे आश्वासन रंजनी यांना दिले. ठरल्या वेळेत तीन कामगार रंजनी यांच्या घरी येऊन सामान बांधून स्थलांतराची तयारी करू लागले. बंदिस्ती करताना वृध्द महिलेचा सोन्याचा ऐवज कुठे आहे यावर त्यांचा डोळा होता. बंदिस्ती करताना तीन कामगारांनी चांदीच्या साखळ्या, सोन्याची कर्णफुले, आवश्यक किराणा सामान चोरले. सामान वाहतुकीसाठी १४ हजार रुपये भाडे दर आकारला होता.

हेही वाचा >>> डोंबिवलीत मानपाडा रस्त्याच्या सीमारेषा, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गिकेत बेकायदा बांधकाम, ३५ लाखाला सदनिका, ७५ लाखांना गाळ्यांची विक्री सुरू

घरातील थोड्या फार सामानाची बांधाबांध करुन किमती ऐवज हाताशी लागल्यावर तिन्ही कामगारांनी वृध्द महिलेला आम्ही बाहेर जाऊन येतो असे खोटे कारण देऊन सामानाची नवीन घरी वाहतूक करून न देता पळून गेले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. तीन महिन्यापूर्वी याच भागातील एका रहिवाशाची तुमचे घरगुती सामान केरळला पोहचवतो असे सांगून त्यांचे सामान केरळला न पोहचविता लंपास केल्याचे उघड झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli robbery workers came to pack the goods at home in dombivali and stole valuable articles zws