हस्तकला, वीणकाम, शिल्पकला अशा अनेक हस्तोद्योगातील कलाकारांनी तयार केलेल्या, केंद्र, राज्य शासनाच्या कला विभाग प्राधिकरण, विकास आयुक्तांची मान्यता असलेल्या हस्तकला कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या यादीतून डोंबिवली रेल्वे स्थानकाला वगळल्याने कलाक्षेत्रातील जाणकार, प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजारातील कृत्रिम वस्तू खरेदीपेक्षा अलीकडे आदिवासी, दुर्गम, डोंगर भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना शहरी रहिवासी सर्वाधिक पसंती देतात. या माध्यमातून आदिवासी दुर्गम भागातील कारागिरांच्या कलाकुसरीला शहरी बाजारपेठ उपलब्ध होते. या वस्तुंच्या विक्रीतून कारागिरांना केलेल्या कामाचा मोबदला आणि रोजगार वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे दुर्गम भागातील कलाकरांच्या वस्तूंची अधिकाधिक रेल्वे स्थानकांवरून विक्री होणे आवश्यक आहे, असे ग्रामीण भागात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
मध्य रेल्वेने वीणकाम, हस्तकला, शिल्पकला, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, परेल, दादर, शीव, लो. टिळक टर्मिनस, भांडुप, मुलुंड, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, लोणावळा, इगतपुरी, पनवेल या पंधरा स्थानकांची निवड केली आहे. या स्थानकांवरील मंचावरून बांबू, पेपर, ताग, कपडा, चामडे, दगड यांपासून कारागिरांनी हातांनी तयार केलेल्या वस्तू विक्री केल्या जाणार आहेत. याशिवाय हंगामाप्रमाणे तयार होणाऱ्या वस्तू, फळे, खाण्याच्या वस्तू ठेवण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
मेघालय, नागालँड भागातील कारागिरांनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन यापूर्वी डोंबिवलीत भरले होते. या उपक्रमाला डोंबिवलीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. असे असताना डोंबिवली रेल्वे स्थानक ‘एक स्थानक एक उत्पादन’ योजनेतून वगळल्याने प्रवासी, शहरी कलाकार नाराज आहेत.
मध्य रेल्वेच्या खाद्यान्न विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जी रेल्वे स्थानके खूप गर्दीची आहेत. त्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार नाही. डोंबिवली हे मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. याठिकाणी हस्तकला वस्तू विक्रीचा मंच फलाटावर लावला तर तेथे खरेदीसाठी गर्दी होईल. शहरातील रहिवासी तेथे खरेदीसाठी येतील. फलाटावरील प्रवाशांना त्या गर्दीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोंबिवली स्थानक या योजनेसाठी निवडले गेले नाही.