डोंबिवली – ठाकुर्लीतील कचोरे येथील वीर सावरकर नगर भागातील चौधरी मैदानावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दोन दिवसापूर्वी काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संलग्न संस्थांनी, हिंदू नागरिकांनी बुधवारी रात्री आठ वाजता डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर आप्पा दातार चौकात, पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना निलंबित केले आहे.

स्वयंस्फूर्तीने हिंदू नागरिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, संलग्न परिवारातील कार्यकर्ते हातात निषेधाचे फलक घेऊन कचोरे येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत होते. शांततेत हा निषेधाचा कार्यक्रम करण्यात आला. हिंदू संघटनाचा भाग म्हणून यावेळी ‘झंडा हिंदू राष्ट्र का, झंडा भारत वर्ष का’ हे गीत सामुहिक पध्दतीने गाण्यात आले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्ही निषेध कार्यक्रमांच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संघ आणि परिवारातील ज्येष्ठ आणि नव्या दमाचे कार्यकर्ते अधिक संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिंदू महिला, पुरुषांची उपस्थिती लक्षणीय होती. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हिंदू बांधवांनो जागे व्हा, असे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागातील कचोरे गाव हद्दीत चौधरी मैदान येथे संघ स्वयंसेवक संजू चौधरी आणि प्रशिक्षक पवन कुमार हे मागील महिन्यापासून लहान मुलांचे बाल प्रशिक्षण शिबीर संध्याकाळच्या वेळेत घेतात. या उपक्रमात मुलांना विविध प्रकारचे खेळ शिकवले जातात. हा उपक्रम दोन दिवसापूर्वी कचोरे मैदानावर सुरू होता. त्यावेळी तेथे बाजुच्या वस्तीमधून दगड फेकण्यात आले होते. त्याकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा या प्रशिक्षण शिबिराच्या दिशेने मैदानाजवळच्या झुडपांमधून अज्ञातांनी दगड फेकले. सुदैवाने हे दगड कोणा बाल कार्यकर्त्याला लागले नाही. या दगडफेकीमुळे प्रशिक्षण शिबीर बंद करण्यात आले. परिसरात दगड कोणी फेकले याचा तपास करण्यात आला. कोणी आढळले नाही. या प्रकरणाची माहिती संघ स्वयंसेवक संजू चौधरी यांनी टिळकनगर पोलिसांना दिली.

हवालदार शिवम राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पालिकेच्या झोपु योजनेतील न्यू गोविंदवाडी येथील मागील बाजूकडील अंधारातून कोणीतरी सिमेंटचे तुकडे संघाच्या बाल प्रशिक्षण शिबिरावर फेकून बाल केंद्रातील मुलांच्या जीवितास धोका निर्माण केला. या माध्यमातून धार्मिक तेढ आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अज्ञात व्यक्ति विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटक केली होती. त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्याने, कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठांच्या आदेशावरून टिळकनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना निलंबित केले आहे.

Story img Loader