डोंबिवली : मुसळधार पावसामुळे घर गळतेय म्हणून एका महिलेने एका बिगारी कामगाराच्या शाळकरी मुलाला आपल्या घराच्या छतावर गळके छत दुरूस्तीसाठी चढविला. छत दुरुस्तीचे काम करताना विद्यार्थ्याला विजेचा जोरदार धक्का लागून तो जागीच मरण पावला. याप्रकरणी घर मालकीणीवर मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन रमेश जाधव (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रोशनचे काका सूर्यकांत जाधव यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर , जय मल्हारनगर येथे बुधवारी हा प्रकार घडला आहे. आशा सुभाष जैयस्वाल असे घर मालकीणीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…कल्याणमधील बैलबाजारातील कंपनीत तरूणीचा कामगारांकडून विनयभंग

पोलिसांनी सांगितले, टाटा पॉवर जय मल्हानगर येथे आशा जैयस्वाल यांचे चाळीचे बैठे घर आहे. हे घर पाऊस सुरू झाला की गळते. घरात पावसाचे पाणी गळू नये म्हणून आशा यांनी ताडपत्री टाकण्याचा निर्णय घेतला. हे काम करण्यासाठी रोशन जाधव याला सांगितले. घराच्या छतावर पावसामुळे शेवाळ बाजल्याने निसरडे झाले आहे. रोशनला हातमोजे, हेल्मेट, रबरी बूट अशी जीव संरक्षणाची पुरेशी साधने देऊन मग घरावर चढविणे आवश्यक होते. अशी कोणतीही साधने न देता रोशनला आशा यांनी घराच्या छतावर चढविले. छत दुरुस्ती आणि त्यावर ताडपत्री टाकत असताना रोशनाला अचानक घरावरून गेलेल्या जिवंत वीज वाहिनीचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने रोशन घरावरून जमिनीवर फेकला.

हेही वाचा…कल्याण पूर्व विधानसभेत गणपत गायकवाड उमेदवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सूतोवाच

जमिनीवर जोराने आदळल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. आरोपी आशा जैयस्वाल यांच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शाहू काळदाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli student electrocuted and killed while repairing leaky roof case filed against house owner psg
Show comments