भगवान मंडलिक, लोकसत्ता
डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकालगत डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या पहिल्या माळ्यावर कल्याण डोंबिवली पालिकेने ४० लाख खर्च करून गेल्या वर्षी १५० विद्यार्थी क्षमतेची एक वातानुकूलित अभ्यासिका तयार केली आहे. या अभ्यासिकेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन होऊन नऊ महिने उलटले तरी पालिकेकडून अभ्यासिका डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाकडे हस्तांतरित किंवा सुरू करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
डोंबिवलीत सुसज्ज ग्रंथालय असावे म्हणून माजी नगराध्यक्ष दिवंगत आबासाहेब पटवारी, विष्णू सोमण, गोपाळराव कुलकर्णी, सुभाष मुंदडा, सुरेश पिंगळे, सुधीर बढे अशा विचारी मंडळींनी ४० वर्षापूर्वी शहरात ग्रंथसंग्रहालय सुरू केले. पालिकेच्या इमारतीत आटोपशीर जागा ग्रंथसंग्रहालयाला मिळाली. शासन सेवेतून निवृत्त, विचारी मंडळी अनेक वर्ष सामाजिक भावनेतून ग्रंथालयाचा कारभार चालवितात.
आणखी वाचा-डोंबिवलीत कमान अडवतेय वाहनांची वाट, दोन महिन्यांपासून कमानींनी अडवला १० फुटाचा रस्ता
ग्रंथसंग्रहालयात २९ हजार पुस्तके, अठराशे वाचक सदस्य आहेत. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर ग्रंथसंग्रहालय आहे. वर्तमानपत्र वाचनासाठी स्वतंत्र दालन आहे. वाचनालयात बहुतांशी नोकरदार, ज्येष्ठ, वृध्द मंडळी येतात. त्यांना जिन्यांची चढउतर होत नाही म्हणून ग्रंथालयासाठी तळ मजल्याला जागा देण्याची व्यवस्थापनाची पालिकेकडे मागणी होती. पहिल्या माळ्यावर अभ्यासिका, तळ मजल्याला ग्रंथसंग्रहालय सुरू केले तर नोकरदार मंडळींना पुस्तके अदान प्रदान करणे शक्य होणार होते.
ग्रंथसंग्रहालय इमारतीच्या तळ मजल्याला दोन वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शिधावाटप कार्यालय सुरू करण्यात आले. पहिल्या माळ्यावर शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने अभ्यासिका विकसित करण्यात आली. अभ्यासिकेसाठी ४० लाख रूपये पालिकेने खर्च केले. अभ्यासिकेत लॅपटॉप, वायफाय, स्वच्छतागृह, पाणी अशा सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात खासदार शिंदे, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत सुसज्ज अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. अभ्यासिकेचा ताबा अद्याप डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाकडे पालिकेकडून देण्यात आलेला नाही. ताबा नसल्याने अभ्यासिका बंद आहे. ग्रंथसंग्रहालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील ४० क्षमतेच्या अभ्यासिकेत विद्यार्थी सकाळी ९.३० ते सायंकाळी ७.३० यावेळेत दाटीवाटीने बसतात. काही विद्यार्थी बाहेरील मोकळ्या जागेत बसतात. दरमहा १५० रूपये शुल्क असल्याने मुंबई, ठाणे परिसरात शिक्षण घेणारे बदलापूर, टिटवाळा, कल्याण, दिवा, डोंबिवली, २७ गाव भागातील विद्यार्थी अभ्यासिकेत येतात.अनेक विद्यार्थी अभ्यासिकेसाठी ग्रंथसंग्रहालयात येतात. जागे अभावी त्यांना परत जावे लागते. नवीन अभ्यासिका पालिकेने लवकर सुरू करवी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. राजकीय दबावातून एका खासगी ग्रंथालय चालकाला अभ्यासिका चालवायला देण्याच्या हालचाली पालिकेत सुरू आहेत. त्याला डोंबिवलीतील विचारी नागरिकांनी विरोध करण्याचे ठरविले आहे.
आणखी वाचा-कंत्राटी कामगारांना दिवाळीपुर्वी वेतन द्या- ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे खातेप्रमुखांना आदेश
“डोंबिवली ग्रंथसंग्रहालयातील अभ्यासिका लवकर सुरू केली जाईल. सुरू करण्यात कोणतेही अडथळे नाहीत.” -डॉ. भाऊसाहेब दांगडे,आयुक्त, कल्याण-डोंबिवली पालिका
“नवीन अभ्यासिकेचा ताबा पालिकेने दिला तर १०० हून अधिकचे विद्यार्थी येथे सामावून घेणे शक्य होणार आहे. ताबा मिळण्यासाठी आम्ही पालिकेकडे पाठपुरावा करत आहोत.” -सतीश कुलकर्णी, अध्यक्ष, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय.