डोंबिवलीकर निवासी असलेली प्रसिध्द जलतरणपटू सुखजित कौर (४९) यांनी कल्याण मधील न्यू वायले स्पोर्ट्स क्लब येथील तलावात १४ तासात १२४६ पोहण्याच्या फेऱ्या (राऊंड) मारुन इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड्समध्ये आपल्या नावाची नोंद केली. त्यांनी यापूर्वीचा १२ तासात पोहण्याचा स्मिता काटवे यांचा विश्वविक्रम मोडीत काढला.
हेही वाचा >>>डोंबिवलीत रिक्षा चालकाला ठार मारण्याच्या आरोपातून नाडर टोळीची निर्दोष मुक्तता
सुखजित या लांब पल्ल्याच्या जलतरणपटू म्हणून ओळखल्या जातात. मुंबई वि्द्यापीठातून त्यांनी व्हाॅलीबाॅल, ट्रायथलाॅन स्पर्धांसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. मागील अनेक वर्ष आपण जलतरण क्षेत्रात विक्रमी टप्पे पार करत आहोत. परंतु त्याची दखल ज्या प्रमाणात शासन स्तरावर घेणे आवश्यक आहे त्या प्रमाणात ती घेतली जात नाही, अशी खंत कौर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात ओला, उबर चालकांना अघोषित बंदी?स्थानिक रिक्षा चालकांच्या दादागिरीने रहिवासी हैराण
आगामी आंतरराष्ट्रीय फिना मास्टर्स स्पर्धेसाठी आपण सज्ज आहोत. यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. हे पाठबळ मिळाले तर आपण अनेक विक्रमी भराऱ्या जलतरण क्षेत्रात घेऊ शकतो, असा विश्वास कौर यांनी व्यक्त केला. आतापर्यंत आपणास शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत किंवा साहाय्य मिळालेले नाही. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून शासनाकडून न मिळालेल्या सहकार्याविषयीची खंत व्यक्त करुन आगामी वाटचालीसाठी शासनाने साहाय्य करावे अशी मागणी करणार आहोत, असे कौर यांनी सांगितले.जलतरण क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक क्रीडा संस्थांनी सुखजित कौर यांना सन्मानित केले आहे.