डोंबिवली – वाहतूक विभागाची परवानगी न घेता मेट्रोच्या ठेकेदाराने मंगळवारी रात्री कल्याण शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौक या वर्दळीच्या भागात मेट्रो मार्गाच्या कामासाठी रस्ता रोधक उभे केले. या रोधकांमुळे शिळफाटा रस्त्याला बुधवारी सकाळपासून वाहतूक कोंडीचा फटका बसला. शिळफाटा रस्त्यावर विना परवानगी रोधक उभे केल्याने मेट्रो कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पकंज शिरसाट यांनी बुधवारी माध्यमांना दिली.
मेट्रोच्या ठेकेदाराने मानपाडा चौकात उभारलेले आणि वाहतुकीला अडथळा ठरत असलेले विना परवानगीचे रस्ता रोधक जेसीबीच्या साहाय्याने बाजुला करण्यात आले. या रोधकाच्या बाजुला वाहतूक दर्शक खांंब होता. दुहेरी मार्गिकेतील वाहतूक एका मार्गिकेतून सुरू झाली. यामुळे कोंडी झाली. वाहतूक विभागाची परवानगी न घेता हे रोधक उभे करून शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी केली म्हणून मेट्रो कंपनीला नोटीस पाठविण्यात येणार आहे, असे उपायुक्त शिरसाट यांनी सांगितले.
मानपाडा चौकात रस्ता रोधक उभे केल्याने रात्रीपासून शिळफाटा रस्त्यावर मानपाडा भागात वाहतूक कोंडीला सुरूवात झाली होती. सकाळी शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने मानपाडा चौक परिसरातील रस्ते वाहतूक कोंडीने गजबजून गेले. टाटा नाका, सोनारपाडा, काटई, वैभवनगरी पर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही मार्गिकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व कोंडी झाल्याचे समजताच वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट, साहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे शिळफाटा रस्त्यावर आले. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सकाळपासून मानपाडा चौक भागात झालेली कोंडी आपल्या वाहतूक पोलीस, सेवकांच्या माध्यमातून सोडवित होते.
रुग्णवाहिका, नोकरदार, शाळेच्या बस, पलावा, रुणवाल भागातील रहिवासी या कोंडीत अडकले. विनापरवानगी रोधक कोंडीला कारणीभूत असल्याने ते उपायुक्त शिरसाट यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने बाजुला करण्यात आले. यामुळे वाहतुकीचा तयार झालेला फुगवटा कमी करण्यासाठी वाहतूक विभागाला दुपार झाली.
महावितरणचा अडथळा
शिळफाटा रस्त्यालगत महावितरणचे खांब आहेत. या खांबांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे खांब स्थलांतरित करावेत म्हणून महावितरणच्या वरिष्ठांना कळवुनही त्याची ते दखल घेत नाहीत. आमच्याकडे निधी नाही, अशी त्यांची साचेबध्द उत्तरे असतात, अशी खंत उपायुक्त शिरसाट यांनी व्यक्त केली. महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांना संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिळफाटा रस्ते बाधितांना अद्याप भरपाई दिली नाही. बाधित शेतकरी रुंदीकरण करून देत नाहीत. हे विषय पण मार्गी लागणे आवश्यक आहेत.
शाळांना सुट्टी
शिळफाटा रस्त्यालगतच्या शाळांनी दुपारच्या सत्रातील विद्यार्थी कोंडीमुळे शाळेत वेळेत येणार नसल्याची शक्यता विचारात घेऊन दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर केली. सकाळच्या सत्रातील शाळा लवकर सोडल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मौखिक, विज्ञान, संगणक परीक्षा सुरू आहेत. त्या पुढे ढकलाव्या लागल्या, असे एका शाळा चालकाने सांगितले.