डोंबिवली : डोंबिवली पूर्व एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. याठिकाणी ६ मेपर्यंत उमेदवार मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने ६ मेपर्यंत घरडा सर्कलकडे येणारे रस्ते सकाळी १० ते संध्याकाळी सहा वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत वाहन चालकांना पर्यायी मार्गाने जाण्याची सूचना वाहतूक विभागाने केली आहे. पर्यायी मार्गामुळे घरडा सर्कल भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याची शक्यता आहे. घरडा सर्कल हे डोंबिवली शहराचे प्रवेशव्दार आहे. या भागात पेंढरकर महाविद्यालय, कल्याण बंदिश हॉटेल, डोंबिवली जीमखाना, डोंबिवली शहरातून बाहेर पडणारी वाहने, आजदे, सागर्ली भागात जाणारे असे एकूण सहा रस्ते आहेत. या रस्त्यांवरील वाहने एकाच वेळी पर्यायी मार्गाने जाणार असल्याने शहरांतर्गत अरुंद रस्ते कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरणे आणि माघार घेण्याच्या ६ मेपर्यंत हे रस्ते बंद राहणार आहेत.

हेही वाचा…ठाणे : पोलीस दलातील अधिकारी महाविकास आघाडीच्या रडारवर

प्रवेश बंद आणि पर्यायी रस्ते

डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून चार रस्ता, शेलार नाकामार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने शिवम रुग्णालय येथे उजवे वळण घेऊन डोंबिवली जीमखाना रस्त्याने सागर्ली रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

शिळफाटा रस्त्याने कल्याण, ठाणे, पनवेल बाजुने सुयोग हॉटेल, रिजन्सी अनंतम, पेंढरकर महाविद्यालय मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना एमआयडीसीतील आर. आर. रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने उजवीकडे वळण घेऊन मिलापनगर, कावेरी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा…ठाणे, भिवंडीत चार उमेदवारांचे अर्ज दाखल जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघासाठी ७७ नामनिर्देशनपत्राचे वितरण

खंबाळपाडा, बंदिश हॉटेल, ९० फुटी रस्त्याने चोळेगावातून घरडा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने बंदिश हॉटेल येथे डावे वळण घेऊन विको नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. आजदे गाव, आजदे पाडा कमान येथून घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व वाहनांना शिवम रुग्णालय येथून इच्छित स्थळी जाण्यास मुभा आहे.

Story img Loader