कल्याण: डोंबिवली जवळील पिसवली गाव हद्दीत गुरुवारी रस्त्यावर सापडलेल्या मतदार ओळखपत्र प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कल्याण ग्रामीणच्या निवडणूक अधिकाऱ्याने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या विरुध्द शुक्रवारी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कारवाईत कल्याण डोंबिवली, ठाणे पालिका शाळांंमधील शिक्षक, कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरूवारी रस्त्यावर मतदान ओळखपत्र सापडल्यापासून कोणतीही भूमिका न घेणाऱ्या कल्याण ग्रामीण निवडणूक विभागाने कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी या लोकसभेची निवडणूक रद्द करून फेर निवडणूक घेण्याची मागणी शुक्रवारी दुपारी केली. त्यानंतरच्या दोन तासात खडबडून जागे झालेल्या निवडणूक विभागाने तत्परतेने हालचाली केल्या. या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (ब्लाॅक लेव्हल ऑफिसर) यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थलांंतरित आरक्षित तिकिटांचे केंद्र सज्ज

कल्याण ग्रामीणचे मतदान नोंदणी अधिकारी विश्वास गुर्जर यांनी सांगितले, पिसवली गाव हद्दीत रस्त्यावर एका पोतडीत ७२० जुनी मतदार ओळखपत्रे, पाच शैक्षणिक कागदपत्रे आढळली. ही सर्व कागदपत्रे कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील शाळा क्रमांक १९ मधील आहेत. या शाळेतील रद्दी शिक्षकांनी काढून ती रद्दी विक्रेत्याला विकली होती. या रद्दीमध्ये शालेय कागदपत्रांबरोबर शिक्षकांनी शाळेत असलेली मतदान ओळखपत्रे एका पोतडीत भरून ती रद्दी विक्रेत्याला विकली होती.

ही रद्दी एक टेम्पोत भंगार विक्रेता घेऊन जात होता. त्यावेळी पिसवली गावाच्या प्रवेशव्दार कमानीजवळ टेम्पोतून मतदान ओळखपत्रे असलेली पोतडी पडली. ती टेम्पो चालक, भंगार खरेदीदाराच्या निदर्शनास आली नाही. पोतडीत मतदान ओळखपत्रे असल्याने एका नागरिकाने ती मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिली. ६७९ ओळखपत्रे २००६ ते २००४ काळातील जुनी आहेत. ४१ स्मार्ट कार्ड यात आहेत. ती २०१७ ते २०२१ काळातील आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री आणि गणेश नाईक विसंवाद मिटता मिटेना, गणेश नाईकांच्या विधानाची कार्यकत्यांमध्ये चर्चा

शाळेतून रद्दी विकताना संबंधित शाळेतील शिक्षक, शाळाप्रमुख, या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी जी काळजी घेणे आवश्यक होते. ती न घेतल्याने या प्रकरणाशी संबंधित कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, दिवा प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचारी यांंच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निवडणूक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. तसेच, या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाने व्यक्तिगत पातळीवर कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत, असे मतदान नोंदणी अधिकारी विश्वास गुर्जर यांनी सांगितले.

हेही वाचा : अन्यथा राजन विचारे, विनायक राऊत पराभूत होण्याचे कारण नव्हते, नाना पटोलेंचा शिंदे सरकारवर आरोप

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. तक्रारदार उमेदवार वैशाली दरेकर यांनी याप्रकरणाची निष्क्षपातीपणे चौकशी झाली नाहीतर आपण केंद्र, राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत, असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli voter id card found on the road case registered against blo officer css
Show comments