डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या चौक, रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत एकही वाहतूक पोलीस, सेवक तैनात नसल्याने पश्चिमेतील महत्वाचे रस्ते, चौक दररोज वाहन कोंडीत अडकत आहेत. या कोंडीचा सर्वाधिक फटका कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना बसत आहे. पश्चिमेत वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलीस तैनात केले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील सर्वच रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरण झाले नाही. या रस्त्यांच्या दुतर्फा दुकानदार पदपथ अडवून आपले सामान ठेवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता राहत नाही. रिक्षा, मोटारी, अवजड वाहने एकाचवेळी रस्त्यावरून धावत असल्याने या अरूंद रस्त्यावर कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील कोल्हापुरे इस्टेट चौक दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत वाहन कोंडीत अडकलेला असतो. याच रस्त्यावरील प्रसाद स्नॅक्स दुकानाजवळील चौक कोंडीत अडकलेला असतो. याशिवाय घनश्याम गुप्ते रस्त्यावरील गोपी माॅल चौकाला कोंडीचा विळखा पडलेला असतो.

हे ही वाचा…ठाण्यात जागोजागी कचऱ्याचे ढिग; काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी

कोल्हापुरे इस्टेट चौकातून गरीबाचापाडा, सुभाष रोड, गणेशनगर भागात जाणारी आणि रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने धावतात. प्रसाद स्नॅक्स दुकानाजवळील चौकात भागशाळा मैदान ते गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्त्याकडे जाणारी वाहने धावतात. गोपी माॅल चौकातून सम्राट चौक ते नवापाडा भागात जाणारी वाहने धावतात. संध्याकाळच्या वेळेत या चौकांमध्ये एकही वाहतूक पोलीस नसतो. त्यामुळे प्रत्येक वाहन चालक चढाओढीच्या स्पर्धेत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या चढाओढीत सर्व वाहने चौकांमध्ये अडकून पडतात. यावेळी परिसरातील रस्ते, गल्ल्या वाहनांंनी बजबजून जातात.

हे ही वाचा…डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमधून, रेल्वे मार्गात उतरताना प्रवासी जखमी

डोंबिवली वाहतूक विभागाला या सर्व चौक आणि तेथील कोंडीची माहिती आहे. या भागात दररोज संध्याकाळी एकही वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक या भागात तैनात नसतो, असे रिक्षा चालक मालक संघटनेचे शेखर जोशी यांनी सांगितले.

येत्या पंधरा दिवसानंतर दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील पादचारी, वाहनांची संख्या वाढणार आहे. हा विचार करून डोंबिवली वाहतूक विभागाने डोंबिवली पश्चिमेतील वर्दळीच्या चौक, रस्ते भागात वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. या मागणीचा विचार केला नाहीतर मात्र रिक्षा चालक आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेने दिला आहे.