कल्याण- उल्हासनगरमध्ये नवजात बालकांची खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना उल्हासनगर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. या गुन्हेगारांनी यापूर्वी अशी काही कृत्ये केली असतील तर त्याचा तपास पोलिसांनी करावा. या गुन्हेगारांना संघटित गुन्हेगारीचे ‘मोक्का’ कलम लावावे, अशी मागणी डोंबिवली महिला महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे केली आहे. मागील काही वर्षापासून कल्याण, उल्हानगर, ठाणे पट्ट्यात नवजात बालकांची विक्री करण्याचे प्रकार वाढत आहेत. गरीबी किंवा अन्य काही कारणांमुळे असे प्रकार होत असले तरी ते बेकायदा आहेत.
त्यामुळे अशा खरेदी विक्री प्रकरणात सहभागी होणाऱ्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गु्न्हेगार कायद्याने कारवाई होणे आवश्यक आहे. त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, अशी मागणी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली.यासंदर्भात एक निवेदन उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिले. यावेळी डोंबिवली महिला महासंघाच्या अध्यक्षा प्रा. डाॅ. विंदा भुस्कुटे, सनदी लेखापाल जयश्री कर्वे, ॲड. तृप्ती पाटील, पोलीस मित्र राजश्री पाजनकर, निवृत्त शिक्षिका संगीता देशपांडे उपस्थित होत्या.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील फलकांवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख, छबीतून बाळासाहेब थोरात गायब
उल्हासनगर मधील नवजात बालक खरेदी विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सहभागींवर कायदेशीर कारवाई होईल यादृष्टीने तपास केला जात आहे. या गुन्ह्यातील एकही आरोपी सुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.