डोंबिवली: नववर्ष स्वागत यात्रे निमित्त डोंबिवली, कल्याणमध्ये सांस्कृतिक मंच, श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित धार्मिक, सांस्कृतिक, नृत्य कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालकांपासून ते तरुण, तरुणी, ज्येष्ठ, वृध्द मोठ्या उत्साहाने या उपक्रमांत सहभागी होत आहेत. डोंबिवलीत रविवारी आयोजित सांस्कृतिक पथावरील कार्यक्रमात नागरिक आनंदाने सहभागी झाले होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पंचमहाभूतांची दिंडी शहराच्या विविध भागातून काढण्यात आली. अग्नि, जल, वायू, पृथ्वी, आकाश या पाच तत्वांभोवती आपले जीवनमान अवलंबून आहे. त्यांचे संवर्धन करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे असा संदेश दिंडी देण्यात येत होता. विविध झाडांची रोपे, वनौषधी वनस्पतींच्या कुंड्या हातात घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
आपल्या पारंपारिक संस्कृतीचे जतन नव्या जगात होणे आवश्यक आहे. घरगुती नवीन वस्तुंची ओळख नवीन पीढीला व्हावी यासाठी घरातील उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा, जात, पितळी जुने डबे, अच्छर नावाचे जुने माप अशा जुन्या वस्तू सांस्कृतिक उपक्रमात मांडण्यात आल्या होत्या. पारंपारिक वेशात आलेल्या महिला, लहान मुलांनी या वस्तुंचा हातळणी करुन आनंद लुटला.
विविधतेमधून एकतेचा संदेश देण्यासाठी विविध प्रांतामधील, विविध प्रकारचे पेहराव करुन महिला, बालगोपाळ गाणी गात सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाली होती. जागतिक उष्णतामान, हवामान बदलाचा विचार करता प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी का आणि कसे पुढे आले पाहिजे याची माहिती देण्यासाठी उर्जा फाऊंडेशन, पर्यावरण दक्षता मंडळ, श्री लक्ष्मी नारायण संस्था, विवेकानंद मंडळ यांनी पंचमहाभुतांच्या दिंडीचे आयोजन केले होते. जल साक्षरता अभियानाची माहिती यावेळी देण्यात आली. लघुपट नागरिकांना दाखविण्यात आले. भरडधान्याचे महत्व कळण्यासाठी ज्वारी, बाजारी, वरई, नाचणी, राळ, भगर कोडो, काकणी धान्यांपासून विशेष पदार्थ महिलांनी तयार केले होते. शहापूर जवळील खोस्तेपाडा येथील आदिवासी महिलांनी भरडधान्याचे पदार्थ बनवले होते. पाककलांमधून महिलांनी आपले कौशल्य दाखवून दिले. या स्पर्धेत आरती शिंदे, बबिता अत्रे, तेजल सावंत, संहिता कांड, माधवी चांदोरकर यांनी बक्षिसे मिळविली.
ढोलताशा, झांजपथक, संबळ, गोंधळी, कोळी नृत्य, जोगवा, लावणी, वाघ्या मुरळी सांस्कृतिक पथात सहभागी होऊन आपले आविष्कार दाखवत होते. ‘माझी डोंबिवली, स्वच्छ डोंबिवली’ निबंध स्पर्धेत ४५ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्ररंगभरण स्पर्धेत विद्यार्थी हौसेने सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाविका खटाव, गौरव आहेर, स्वरा देसाई, पार्थ निस्ताने, अनन्या यादव, संस्कृती निपाने, मोहक बेंदळे, यश देवधर, अनुश्री खोचरे, आनंदी पेंतपिल्लई, स्वरा म्हादोळकर, वियांशी जोशी, प्रिया चौधरी, ऋग्वेद नरकडे, अनुज्ञा पानसरे, आरुषी गुप्ता, दर्शन कुबल, अबिगेल जॅकोब यांनी यश मिळवले.
बहुभाषिक भजन स्पर्धेत गुजराती, कच्छी, कानडी, मारवाडी, अहिरणी, मल्याळी, तमीळ, बंगाली, कोकणी अशी एकूण १५ भजनी मंडळे सहभागी झाली होती. दुचाकी फेरीत विविध पेहरावातील महिला पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गणेश मंदिरा जवळील गीत रामायण कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सोमवारी मंदिरात आयोजित अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थित होती. कल्याणमध्ये शोभायात्रेनिमित्त आयोजित उपक्रमात नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत.