ठाणे : किसननगर येथील ५० वर्ष जुन्या मंदिरातील दानपेट्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दानपेट्यांमध्ये साडेपाच हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी मंदिरातील व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसननगर येथील पाडा क्रमांक एक परिसरात मंदिर आहे. मंदिराला मुख्य प्रवेशद्वार असून मंदिराच्या मागील बाजूस दोन दरवाजे आहे. भाविकांसाठी दररोज सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत मंदिराचे प्रवेशद्वार दर्शनासाठी उघडे केले जातात. हे मंदिर ५० वर्ष जुने असल्याने भाविक मोठ्याप्रमाणात याठिकाणी येत असतात. मंदिरात एकूण नऊ लाकडी दानपेट्या आहेत. रविवारी रात्री ९ नंतर पुजाऱ्याने मंदिर बंद केले होते. सोमवारी पहाटे ५.३० वाजता मंदिर उघडले असता, मंदिरातील सात दानपेट्या गायब झालेल्या होत्या. पुजारी आणि व्यवस्थापकांनी पाहणी केली असता, मंदिराच्या मागील बाजूचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर व्यवस्थापकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून एकूण साडेपाच हजार रुपये दानपेट्यांमध्ये होते असे तक्रारीत म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd