लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या गर्भगृह नुतनीकरणाच्या कामासाठी नांदेड येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यातील युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी शनिवारी ३० किलो ९०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट श्री गणेश मंदिर संस्थानला दान दिली. बाजारभावाप्रमाणे या चांदीची किंमत २५ लाख रूपये आहे.

श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा आणि प्रवचनकार अलका मुतालिक, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विश्वस्त वैद्य विनय वेलणकर, राहुल दामले, प्रवीण दुधे, उद्योजक श्रीपाद कुळकर्णी, सनदी लेखापाल सुहास आंबेकर उपस्थित होते. श्री गणेश मंदिराने शताब्दी पूर्ण केली आहे. यानिमित्ताने संस्थानने मंदिराच्या सुशोभिकरण, नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.

आणखी वाचा-डोंबिवली: कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी लोकलमधून पडून गंभीर जखमी

गेल्या वर्षभरापासून श्री गणेश मंदिरातील गर्भगृहाच्या नुतनीकरणाचे काम मंदिर संस्थानकडून सुरू आहे. दानशूर, लोकसहभागातून हे काम केले जात आहे. १५० किलो चांदीच्या वापरातून श्री गणपती प्राणप्रतिष्ठेच्या महिरप आणि गर्भगृहाची देखणी सजावट केली जाणार आहे. १५० किलो पैकी सुमारे ६५ किलो चांदीच्या वापरातून गर्भगृहाची देखणी मांडणी करण्यात आली आहे. या कामासाठी अद्याप चांदीची आवश्यकता आहे. मंदिर संस्थानने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली होती. मंत्री चव्हाण यांनी केलेल्या सूचनेवरून नांदेडचे युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला ३० किलो चांदीची वीट देण्याची तयारी दर्शवली.

शनिवारी विधिवत ही वीट धार्मिक विधिने मंदिर संस्थान अध्यक्षा अलका मुतालिक यांच्या स्वाधीन करण्यात आली. उद्योजक मोगरे यांनी दोन महिन्यापूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराला अडिच कोटीची चांदीची मेघडंबरी भेट दिली आहे. सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या वारकरी संप्रदायातील मोगरे कुटुंबीयांकडून विविध धार्मिक संस्थांना दान केले जाते. याच भावनेतून आपण डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिराला चांदीच्या विटेचे दान केले आहे, असे उद्योजक मोगरे यांनी सांगितले.

आणखी वाचा-कल्याण: टिटवाळ्यात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सासर्‍यांसह तीन जण अटकेत

मंदिर गर्भगृहाच्या नुतनीकरणासाठी सुमारे १५० किलो चांदीची आवश्यकता आहे. दानशूर मंडळी या उपक्रमासाठी हातभार लावत आहेत. अशाच उपक्रमातून उद्योजक मोगरे यांनी मंदिराला चांदीची वीट दान केली आहे. या चांदीमधून गर्भगृहाचे उर्वरित काम हाती घेतले जाईल, असे विश्वस्त दामले यांनी सांगितले. संस्थानतर्फे उद्योजक सुमित मोगरे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donation of 30 kg of silver by young entrepreneur of nanded to shri ganesha temple in dombivli mrj