डोंबिवली : डोंबिवली येथे पै फ्रेन्डस लायब्ररीतर्फे १० दिवसांच्या पुस्तक अदान प्रदान कार्यक्रमात ३५ हजार पुस्तकांचे अदान प्रदान करण्यात आले. सहा हजार नवीन पुस्तकांची विविध प्रकाशन मंचावरुन विक्री झाली, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक, पै फ्रेन्डस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी दिली.
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात पुस्तक अदान प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. घरातील जुनी वाचलेली पुस्तके आणून त्या बदल्यात तेवढीच पुस्तके वाचकाला परत मिळत होती. या अदान प्रदान सोहळ्याला राज्याच्या विविध भागातून सुमारे दोन लाख नागरिकांनी भेट दिली. घरातील वाचलेली पुस्तके आणून कार्यक्रम ठिकाणाहून एकूण ३५ हजार पुस्तके वाचकांनी बदलून नेली. २० हजार विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोहळ्याच्या ठिकाणी भेटी दिल्या.
नवीन पुस्तके खरेदी केली. नवनवीन कोणती पुस्तके प्रकाशित झाली आहेत याची माहिती घेतली, असे पै यांनी सांगितले. साहित्य, माहिती तंत्रज्ञान, विचारवंत क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विविध प्रकाशन संस्थांचे मंच कार्यक्रम ठिकाणी होते. पुस्तक अदान प्रदान बरोबर वाचकांनी सहा हजार नवीन पुस्तके खरेदी केली, असे पै यांनी सांगितले. वाचन संस्कृती रुजविणे आणि घरातील वाचलेल्या पुस्तकांची अदान प्रदान व्हावी या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, असे आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.