कल्याण-डोंबिवलीतील महिला रेल्वे पोलिसांना स्वतंत्र ‘चेंजिंग रूम’ नाही
ठाणे स्थानकातील महिला पोलिसांना कोंदट लोखंडी डबा
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांबाबतच्या समाजाच्या बदलत्या दृष्टिकोनाबाबत कोडकौतुक सुरू असले, तरी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या रेल्वे पोलीस ठाण्यातच महिलांची कुचंबणा सुरू आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे, तर ठाणे स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांना एका कोंदट लोखंडी डब्याचा ‘चेंजिंग रूम’ म्हणून वापर करावा लागत आहे. मध्य रेल्वेमार्गावरील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये हे चित्र आहे.
प्रवाशांच्या सर्वाधिक गर्दीची स्थानके म्हणून ठाणे, कल्याण आणि डोंबिवली ही स्थानके ओळखली जातात. या स्थानकांवर महिला रेल्वे प्रवाशांची संख्याही बरीच मोठी आहे. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी बऱ्याचशा महिला कर्मचारी स्थानकात पोहोचल्यानंतर गणवेश परिधान करतात. मात्र कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली नसल्याने त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. ठाण्यासारख्या रेल्वे स्थानकात महिलांना गणवेश परिधान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही व्यवस्थाही तकलादू असल्याचे चित्र पुढे येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात महिला कर्मचाऱ्यांसाठी एक लोखंडी डबा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये कपडे बदलण्याची व्यवस्था असली, तरी तेथील कोंदट वातावरणामुळे श्वास गुदमरत असल्याची प्रतिक्रिया येथील महिला कर्मचारी देतात.
रेल्वे पोलीस ठाण्यांची दुरवस्था झालेली असल्याने महिला पोलिसांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. ते टाळण्यासाठी महिला पोलिसांना प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यात महिला विशेष कक्ष उपलब्ध करून द्यावे. स्वच्छतागृहाची सोय महिलांना करून देण्यात यावी, अशी मागणी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी केली.

Story img Loader