लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ : गेल्या काही काळात शहरात बॅनरबाजीचे प्रकार वाढले असून त्यामुळे शहर विद्रुपीकरणही होते आहे. राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यात आघाडीवर आहेत. कोणत्याही परवानगीशिवाय लावण्या जाणाऱ्या या बॅनरवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र यात ठोस कारवाई होताना दिसत नाही. तरीही पालिका प्रशासनाने आता नागरिकांना या बेकायदा बॅनरची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने दोन दूरध्वनी क्रमांकही जाहीर केले आहेत. त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अंबरनाथ शहरासह आसपासच्या शहरांमुळे बेकायदा बॅनरबाजी ही सर्वच शासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरते आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, इच्छुकांकडून प्रत्येक सण, उत्सवासाठी बॅनर लावले जातात. अंबरनाथ शहरात तर राजकीय कुरघोड्या, एकमेकांना डिवचण्यासाठीही बॅनरबाजी झाल्याचा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका मोठ्या राजकीय कुटुंबातील एका सदस्याला त्याच पक्षाच्या दुसऱ्या गटातील नेत्याने फोडून आपल्याकडे वळवले. त्या सदस्याच्या वाढदिवसानिमित्त संबंधित नेत्याने शहरभर जोरदार बॅनरबाजी केली.
विशेष म्हणजे स्वतःच्या वाढदिवसालाही इतके फलक कधी लागले नसावेत, अशी चर्चा शहरात होती. त्यामुळे शहरातल्या महत्वाच्या रस्त्यांवर, चौकांमध्ये बॅनरची गर्दी झाली होती. परिणामी नागरिक शहर विद्रुप झाल्याने नाराजी व्यक्त करत होते. लग्न, मुंज, साखरपुडा, बारसे, बैलाचा वाढदिवसापासून ते आवडत्या प्राण्याच्या शोकसंदेशापर्यंत बॅनर लागल्याचे शहराने यापूर्वी पाहिले आहे. या बेकायदा बॅनरकडे सातत्याने पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते. मात्र या बेकायदा बॅनरवर कारवाई करण्यात असमर्थ असलेल्या पालिका प्रशासनाने थेट नागरिकांना बेकायदा बॅनरची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाहीर सूचना प्रसारीत केली आहे. उच्च न्यायालयाचा दाखला देत अनधिकृत होर्डींग, बॅनर आणि जाहिरात फलकाबाबत जागरूकता आणि दक्षता घेण्यासाठी तसेच त्यावर कारवाई करण्यासाठी नागरिकांना त्यांची तक्रार देता यावी यासाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर केल्याचे पालिकेने सांगितले आहे.
इथे करा अनधिकृत बॅनरची तक्रार
अंबरनाथ नगरपालिकेने ०२५१-२६८२३५३ / ७७९८११४१२३ हे दोन दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर बेकायदा जाहिराचे छायाचित्र काढून पत्त्यासोबत पाठवता येणार आहे. त्या संबंधित बॅनरवर झालेल्या कारवाईबाबत तक्रारदाराला माहिती दिली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक तक्रारी देण्याचे आवाहन केले जाते आहे.